दोन हजार, पाचशेच्या नोटांवरील लिखाणात घट
By Admin | Published: March 1, 2017 12:45 AM2017-03-01T00:45:14+5:302017-03-01T00:45:14+5:30
न चालण्याचा धसका : रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या आदेशाच्या अंमलबजावणीचा परिणाम
रमेश पाटील --कसबा बावडा --चलनी नोटांवर लिखाण करण्यास रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने जरी बंधने घातली असली, तरी अनेकांकडून नोटांवर लिखाण करण्यात येतच होते. मात्र, याला नुकत्याच नवीन चलनात आलेल्या पाचशे व दोन हजारांच्या नोटा अपवाद ठरल्या आहेत. कारण नवीन नोटांवर जर काही लिहिलेले असल्यास अशा नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत, असे फलकच पेट्रोल पंप, मॉल व काही दुकानांमध्ये झळकू लागल्यामुळे या सर्वांचा परिणाम म्हणून आजच्या घडीलाही नवीन पाचशे व हजारांच्या नोटा ‘क्लिन’ दिसत आहेत.
या नवीन नोटा चलनात येण्यापूर्वी नोटांवर लिखाण करण्यात बँकांचे कॅशिअर आघाडीवर असत. जलद हिशोब करता यावा व वारंवार मोजायचा त्रास होऊ नये, यासाठी नोटांवर लिखाण करण्यात येत होते. नोटांवर लिखाण केल्याने त्या लवकर खराब होतात. त्यामुळे नोटांवर लिहिण्यास बंदी घालण्यात आली होती. १ जानेवारी २०१४ पासून बँकांनी लिखाण केलेल्या नोटा स्वीकारू नयेत, असे आदेश काढण्यात आले होते. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी होत नव्हती.
बँकांचे कॅशिअरही स्वत: नोटांवर लिहीत असल्याने त्यांनी लिहिलेल्या नोटाही स्वीकारण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे नोटांवर लिहिण्याचे कोणाकडूनही बंद झालेले नव्हते. कॅशिअरला १०० नोटांचे बंडल तयार करण्यासाठी नोटांवर वारंवार लिहावे लागत होते. ही पद्धत तशीच पुढे चालू होती.
आता मात्र परिस्थिती बदलली. जेव्हा जुन्या पाचशे व एक हजाराच्या नोटा चलनातून बाद करून नवीन पाचशे व दोन हजाराच्या नोटा चलनात प्रथम आल्यावर अशा नोटांवर लिहिण्यास रिझर्व्ह बँकेने बंदी घातली. याचा परिणाम मात्र लगेचच दिसू लागला. जो-तो अशा नोटा घेताना पारखून व त्यावर काही लिहिलेले तर नाही ना, ते तपासून पाहू लागला. त्यामुळे नोटांवर काही लिहिण्याचे धाडस कोणाकडून झाले नाही.
सध्या अनेक पेट्रोलपंपावर नवीन नोटावर लिखाण केलेले असल्यास अशा नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत, असे फलकच लावले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये जागृती झाली आहे. काही मॉलमध्येही नवीन नोटांवर जर काही लिहिलेले असल्यास अशा नोटा परत केल्या जात आहेत. लहान-मोठ्या दुकानातही लिहिलेल्या नोटा स्वीकारल्या जात नाहीत.
‘एटीएम’मधील नोटा
सध्या एटीएममधून ५०० व २००० च्या नवीन नोटा बाहेर येत आहेत. अशा नोटेवर कुठेही काहीही लिहिलेले नसते. तरीही ग्राहक अशा नोटासुद्धा तपासून घेताना दिसत आहेत. एकंदरीत नवीन नोटा सध्यातरी ‘क्लिन’ आहेत.
लिहिलेली नोट मिळाली तर परत
मुळात नवीन ५०० व २००० च्या नोटा स्वीकारताना त्या पारखून, तपासून खरेदी करताना घेतल्या जातात.
दोन हजाराची नोट जर एखाद्याने दिली, तर त्याचा मोबाईल नंबर व नोटेचा नंबर लिहून घेतला जातो.
चुकून लिहिलेली नोट आली आणि नंतर समजले तर संबंधित ग्राहकाला फोन करून ती परत केली जाते. त्यामुळे नवीन नोटांची बऱ्यापैकी काळजी घेताना लोक दिसत आहेत.