गुळाच्या दरात घसरण, कोल्हापुरात शेतकऱ्यांनी सौदे पाडले बंद
By राजाराम लोंढे | Published: November 22, 2022 03:51 PM2022-11-22T15:51:51+5:302022-11-22T18:42:46+5:30
कर्नाटकी गुळामुळे दर घसरल्याचा आरोप
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाच्या दरात घसरण झाल्याने आज, मंगळवारी आक्रमक शेतकऱ्यांनी गुळाचे सौदे बंद पाडले. समितीमध्ये येणाऱ्या कर्नाटकी गुळामुळे दर घसरल्याचा आरोप करत हा गूळ बंद करा व गुळाला किमान प्रतिक्विंटल ३७०० रुपये दर मिळाला पाहिजे, ही मागणी लावून धरली.
कोल्हापूर जिल्ह्यात यंदा गुऱ्हाळघरे सुरू होऊन दीड महिने झाले; मात्र शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये कमालीची खदखद होती. मंगळवारी बॉक्समधील गूळ रव्यांचा सौदा सुरू असताना अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांनी सौदे काढण्यास मज्जाव केला.
त्यानंतर समितीचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकरी आक्रमक झाले. कर्नाटकी गूळ बंद करा अन्यथा आम्ही समितीत गूळच आणत नाही, असा पवित्रा घेतला. अखेर चर्चेनंतर कर्नाटकातील गुळाची आवक पूर्णपणे थांबवण्यास व्यापाऱ्यांनी तयारी दर्शवल्याने कोंडी फुटली.
मात्र मंगळवारी सौदे होऊच शकले नाहीत, त्यामुळे बाजार समितीत गुळाचे ९०१८ बॉक्स व २२ हजार गूळ रवे पडून आहेत. आज, बुधवारी अमावस्येमुळे गूळ मार्केट बंद असते, त्यामुळे गुरुवारीच सौदे होणार आहेत.