Kolhapur News: काळम्मावाडी धरणातील पाणीसाठ्यात घट, पाणी टंचाई भासणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 06:28 PM2023-02-01T18:28:56+5:302023-02-01T18:57:40+5:30
धरणातून एकूण १२०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
सोळांकुर : काळम्मावाडी (ता. राधानगरी) धरणात आज ३१ जानेवारी अखेर ५६.११ टक्के म्हणजे १४.२४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून गतवर्षीच्या तुलनेत जवळपास सहा टीएमसी पाणी कमी असून खऱ्या पावसाळ्यास तब्बल पाच महिन्यांचा कालावधी असल्याने पाण्याचे सूक्ष्म नियोजन होणे आवश्यक आहे. अशी मागणी जोर धरत आहे.
गतवर्षी जानेवारी- २०२२ अखेर धरणातील पाणीसाठा ७९.०७ टक्के म्हणजे २०.०७ टीएमसी इतका पाणीसाठा होता. यावर्षी ऑक्टोबरअखेर काळम्मावाडी धरण पूर्ण क्षमतेने १०० टक्के (२५.४०) टीएमसीने भरले होते. परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने धरणाच्या पाण्याचा साठा ऑक्टोबरमध्ये चांगला असताना केवळ तीन महिन्यात जवळपास १० टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे.
आज धरणाच्या जलाशयाची पातळी ६३५.५४ मीटर असून धरणाचा पाणीसाठा ४०३.३३ द.ल.घ.मी म्हणजेच ५६..११ टक्के (१४.२४) टीएमसी इतका उपलब्ध आहे. परिणामी दूधगंगा नदी काठावरील गावांना पाणी समस्या भासणार असल्याचे चित्र दिसत आहे.
दूधगंगा काठावरील गावाबरोबर या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पिकांना पाणी समस्या भासणार नाही, याची जबाबदारी संबंधित विभागाने घ्यावी अशी मागणी शेतकरी व भूमिपुत्र करत आहेत. आज धरणातून विद्युत जनित्रासह दूधगंगा नदीपात्रात २५० क्युसेक्स, उजवा कालवा ४५० क्युसेक्स, तर गैबी ५०० क्युसेक्स असे एकूण १२०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उर्वरित पाण्याचे सूक्ष्म नियोजन होणे गरजेचे आहे.