अंबाबाईच्या दर्शन वेळेत कपात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय : अभिषेक सुविधाही बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:30 AM2021-02-25T04:30:21+5:302021-02-25T04:30:21+5:30
कोल्हापूर : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शन वेळेत कपात करण्यात आली आहे. भाविकांना आता सकाळी ...
कोल्हापूर : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शन वेळेत कपात करण्यात आली आहे. भाविकांना आता सकाळी सात ते दुपारी बारा व दुपारी तीन ते रात्री आठ यावेळेत दर्शन घेता येईल. याशिवाय अभिषेकाची सुविधा बंद करण्यात आली असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून खबरदारी म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने बुधवारी मंदिराच्या गरुड मंडपात श्रीपूजक, पोलीस व सुरक्षा यंत्रणांची संयुक्त बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सचिव विजय पोवार, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, श्रीपूजक मंडळाचे सचिव माधव मुनिश्वर उपस्थित होते.
यावेळी पूर्वीप्रमाणे अंबाबाईच्या दर्शनाची वेळ सकाळी सात ते दुपारी बारा व दुपारी तीन ते रात्री आठ अशी करण्यात आली आहे. दुपारी बारा ते तीन या वेळेत मंदिर पूर्णत: बंद राहील. तसेच भाविकांसाठी सुरू करण्यात आलेली ई-पास सुविधा व भाविकांकडून करण्यात येणारे अभिषेकासारखे धार्मिक विधी बंद करण्यात आले आहेत. मंदिराच्या पूर्व व पश्चिम दरवाजातून दर्शन सुरू राहणार असून पूर्व दरवाजाजवळील मंडपात व मुख दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये सामाजिक अंतर राखण्यासाठी मार्कींग करण्यात येणार आहे. मंदिरात येताना मास्क, सॅनिटायझर तसेच भाविकांची तापमान तपासणी सुरू असून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
---
दंडात्मक कारवाई
भाविकांनी मंदिरात येताना भाविकांनी मास्क वापरणे बंधनकारक असून विनामास्क आढळल्यास दोनशे रुपये दंड करण्यात येणार आहे. तसेच मंदिर परिसरात भाविकांनी जास्त वेळ थांबून छायाचित्र अथवा व्हिडिओ, सेल्फी काढण्यात मनाई असून तसे आढळल्यास मोबाईल, कॅमेरे जप्त करून दोनशे रुपये दंड आकारला जाईल.
---
फोटो नं २४०२२०२१-कोल-अंबाबाई मंदिर
ओळ : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, श्रीपूजक व पोलीस प्रशासन यांची प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंबंधी बैठक घेण्यात आली. यावेळी विजय पोवार, समितीचे अध्यक्ष महेश जाधव, पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव उपस्थित होते.
---