शिरोळला नेत्यांनी बांधला आघाड्यांचा घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:13 AM2018-10-02T00:13:45+5:302018-10-02T00:13:50+5:30
संदीप बावचे।
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरोळ : नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज व छाननी प्रक्रियेचा टप्पा पूर्ण झाला आहे. ६ आॅक्टोबर माघारीचा अंतिम दिवस आहे. भाजप, राजर्षी शाहू विकास आघाडी, बहुजन विकास आघाडी व ताराराणी विकास आघाडी यांनी एबी फॉर्म असलेल्या उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिली आहे.
भाजपकडून नगरसेवक पदाच्या सोळा जागेवर पर्यायी एबी फॉर्म असलेल्या उमेदवारांची यादी दिली आहे. बहुजन विकास आघाडीने सात ठिकाणी, तर राजर्षी शाहू विकास आघाडीने अकरा ठिकाणी पर्यायी उमेदवार दिले आहेत, तर ताराराणी विकास आघाडी आणि भारिप पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज युवा विकास आघाडीच्या सतरा पैकी चौदा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकृत उमेदवारी कोणाला, याबाबत सध्यातरी प्रश्नचिन्ह असले तरी उमेदवारांची मात्र घालमेल सुरू झाली आहे.
शिरोळ नगरपालिकेसाठी छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शनिवारी (दि. २९) भाजपसह अन्य तीन आघाड्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपल्या एबी फॉर्म असलेल्या उमेदवारांची यादी सुपूर्द केली. उमेदवाराचे नाव व पर्यायी उमेदवार अशी यादी दिल्यामुळे इच्छुकांची घालमेल सुरू झाली आहे. अनेकांनी नेत्यांना साकडे घातल्याचे चित्र आहे. एकूणच माघारीपर्यंत कशा नाट्यमय घडामोडी घडतात, यावरच उमेदवारी निश्चित होणार आहे.
इच्छुकांना मिळाला पर्याय
शिरोळ नगरपालिकेची पहिलीच निवडणूक चौरंगी होत आहे. भाजप विरोधात नव्याने तीन आघाड्या तयार झाल्यामुळे अनेक इच्छुकांना पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी पालिकेची ही निवडणूक आता रंगतदार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगराध्यक्षपद खुल्या गटातील असल्यामुळे पॅनेलमधील उमेदवारांची मोट बांधूनच नगराध्यक्षपदाच्या विजयाची गणिते नेत्यांना सोडवावी लागणार आहेत.
नेत्यांपुढे डोकेदुखी
उमेदवारी अर्ज माघारीसाठी पाच दिवसांचा कालावधी आहे. यामुळे नगरसेवकपदाच्या १७, तर नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी किती उमेदवार निवडणूक रिंगणात राहणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. बंडखोरीची शक्यता असल्यामुळे इच्छुकांचे रुसवे-फुगवे नेत्यांना काढावे लागणार आहेत. सर्वच नेत्यांकडून व्यूहरचना आखली जात असली तरी फोडाफोडीच्या राजकारणाला आतापासूनच सुरुवात झाली आहे.
भाजपकडून रणनीती
1 भारतीय जनता पक्षाकडून जि. प. सदस्य डॉ. अशोकराव माने यांचे सुपुत्र डॉ. अरविंद माने यांनी उमेदवारी मागितली होती. भाजपकडून त्यांनी अर्जदेखील दाखल केला आहे. मात्र, एबी फॉर्म असणाऱ्या उमेदवारी यादीत त्यांचे नावच नसल्यामुळे त्यांची उमेदवारी भाजपने नाकारली आहे. त्यामुळे डॉ. अरविंद माने कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
2 भाजपकडून प्रभाग दोनमधून गोरखनाथ माने यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी माने हे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप विरोधात लढले होते, तर प्रभाग चारमधील अविनाश माने विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत होते. प्रभाग तीनमधून बाळू शेख की संभाजी चव्हाण यांना उमेदवारी मिळणार याबाबतही उत्सुकता आहे.