टक्का कमी करा; परंतु मराठा आरक्षण द्या
By admin | Published: August 19, 2016 11:56 PM2016-08-19T23:56:17+5:302016-08-20T00:12:21+5:30
छत्रपती संभाजीराजे यांचा आग्रह : तीन खासदारांची ताकद लागल्यास कोल्हापूरचे सोने; दिमाखदार नागरी सोहळ्यात सत्कार
कोल्हापूर : विदर्भ-मराठवाड्यात जाती-जातींतील दरी फार भयंकर आहे. ती कमी व्हावी यासाठी सर्व संघटनांना एकत्र करून मी मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू केला. १९ टक्क्यांची घोषणा झाली; परंतु हा प्रश्न आता न्यायप्रविष्ट आहे. त्यातील एक-दोन टक्का कमी करा; परंतु मराठा समाजाला आरक्षण द्या. खासदार झालो तरी या प्रश्नांसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शुक्रवारी येथे दिली. खासदार राजू शेट्टी, धनंजय महाडिक व मी असे तिघेजण एकत्र झालो, तर कोल्हापूरचे सोने होईल व तसेच काम करून दाखवूया, असा आशावादही संभाजीराजे यांनी व्यक्त केला.
सर्वपक्षीय नागरी सत्कार समितीतर्फे निवृत्त जनरल जे. जे. सिंग यांच्या हस्ते चांदीची तलवार देऊन संभाजीराजे यांचा राष्ट्रपतीनियुक्त खासदार झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. केशवराव भोसले नाट्यगृहात हा दिमाखदार सोहळा झाला. त्यास जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सर्वच स्तरांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर अश्विनी रामाणे अध्यक्षस्थानी होत्या. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होणार होता; परंतु ते काही महत्त्वाच्या कामामुळे अनुपस्थित राहिले. व्यासपीठावर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विमल पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके, उल्हास पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, भरमू पाटील, माजी आमदार युवराज मालोजीराजे, आदी मान्यवर उपस्थित होते.
मी जेवढे सामाजिक काम केले, त्याहून कित्येकपट जास्त काम केलेले लोक कोल्हापूरच्या मातीत आहेत; परंतु तरीही मला खासदारकी मिळाली त्यामागे शिवाजी-शाहूंच्या घराण्याचा अॅडव्हेंटेज व त्यांच्या विचारांचा हा प्रभाव असल्याचे सांगून संभाजीराजे म्हणाले, ‘हा सत्कार माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय आहे. मला कुणाच्या मागे जाण्याची सवय नाही; परंतु हा माझ्या घराण्याचा सन्मान असल्याने तो मी नम्रतेने स्वीकारत आहे. रायगडच्या राज्याभिषेक सोहळ्यावेळी मी एकदा असे म्हणालो होतो की, छत्रपती घराण्यात जन्म हेच माझ्यासाठी सर्वांत मोठे पद आहे. त्यामुळे मी कुणाकडेही खासदारकी मागायला गेलो नाही. मुख्यमंत्र्यांनी मला बोलावून हे पद दिले. बहुजन समाजाचा विकास करण्याची संधी म्हणून मी ते स्वीकारले आहे.
ते म्हणाले, माझा कोणताही अजेंडा नाही; कारण अजेंडा तयार करणे ही बोगसगिरी असते. लोकप्रतिनिधींचा अजेंडा काय हवा हे कोल्हापूरने ठरवायचे आहे. तुम्ही सांगाल तोच अजेंडा आम्ही राबवू. आज माझ्या सत्काराच्या निमित्ताने कोल्हापूरचे सर्वपक्षीय नेते एकत्र आले तसेच या जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे.
जे. जे. सिंग म्हणाले, ‘संभाजीराजेंची खासदारकी ही कोल्हापूरच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे. कोल्हापूरच्या माती व पाण्यामध्ये एवढी ताकद आहे की, मी पाचवेळा कोल्हापूरला आल्यावर माझे आयुष्य दहा वर्षांनी वाढले.’
खासदार महाडिक म्हणाले, ‘शरद पवार यांनी लोकसभेसाठी संभाजीराजेंना संधी दिली होती; परंतु त्यात त्यांना अपयश आले. अपयशाने खचून न जाता त्यांनी गडकिल्ल्यांचे संवर्धन व मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पिंजून काढला. आजचा त्यांचा सत्कार हा त्यांच्या घराण्याचा जेवढा सन्मान आहे, तेवढाच तो संभाजीराजेंच्या कष्टाचा व कर्तृत्वाचाही आहे. निवडून आल्यावर मी तीर्थक्षेत्र आराखडा, विमानतळ विकास, कोकण रेल्वे, अशा काही प्रश्नांचा अजेंडा निश्चित केला होता. बहुतांशी प्रश्न मार्गी लागले आहेत.’
यावेळी महापौर अश्विनी रामाणे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार उल्हास पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर यांनीही मनोगत व्यक्त केली.
यावेळी सत्कार समितीच्या वतीने उद्योजक व्ही. बी. पाटील यांच्या हस्ते अंबाबाईची मूर्ती देऊन जे. जे. सिंग यांचा सत्कार करण्यात आला. समारंभास त्यांच्या पत्नी अनुपमा व मुलगा विवेक सिंगही उपस्थित होते. रामभाऊ चव्हाण यांनी स्वागत केले. निवासराव साळोखे यांनी प्रास्ताविक केले. माहेश्वरी गोखले व अर्जुन नलवडे यांनी सूत्रसंचालन केले. आर. के. पोवार यांनी आभार मानले.
कष्टात मी तुमच्यापेक्षा पुढे...
खासदार झाल्यानंतर संसदेत बोलण्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागले. दहा-दहा तास बसून प्रश्नांच्या नोट्स तयार केल्याची माहिती खासदार महाडिक यांनी भाषणात दिली होती. त्याचा संदर्भ घेऊन संभाजीराजे म्हणाले, ‘महाडिकसाहेब, तुम्ही म्हणता ते खरे आहे; परंतु मी कष्टाला कधीच मागे पडणार नाही. तुम्ही दहा तास कष्ट करीत असाल तर त्यापेक्षा एक टक्का जास्त कष्ट मी करणार आहे. आपल्या दोघांत निरोगी मैत्री राहील. तुम्ही लोकसभेत आणि मी राज्यसभेत आहे. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही.’
‘कोल्हापूरही इधर लाये है’..
गेल्याच आठवड्यात मी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. ते म्हणाले,‘ या भेटीत मी त्यांना कोल्हापूर भेटीचे निमंत्रण दिल्यावर पंतप्रधान म्हणाले,‘हम तो कोल्हापूरही इधर लाये है’.. हे ऐकून माझाही ऊर भरून आला. देशपातळीवर एवढा मोठा सन्मान संभाजीराजे यांना मिळाला आहे.
कुस्तीपंढरी नावालाच...
कोल्हापूरला आम्ही अभिमानाने कुस्तीपंढरी म्हणतो. परंतु सगळ््याच खेळासाठी येथे पायाभूत सुविधांची प्रचंड वानवा आहे. अशी स्थिती असेल तर मग आॅलिम्पिक पदकाची अपेक्षा आपण कशी करणार, अशी विचारणा संभाजीराजे यांनी केली.
ढोलपथकांच्या गजरात
समितीतर्फे सत्काराची जंगी तयारी करण्यात आली होती. यात देवल क्लब ते केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत दुतर्फा ढोलपथकांच्या गजरात खासदार संभाजीराजे यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमस्थळी माजी लष्करप्रमुख जनरल जे. जे. सिंग यांना लष्करातर्फे ‘गार्ड आॅफ आॅनर’ देण्यात आला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे नाट्यगृह व परिसर गर्दीने फुलला होता.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास माजी आमदार नामदेवराव भोईटे, बजरंग देसाई, ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक योगेश जाधव, उद्योजक चंद्रकांत जाधव, श्रीमती रजनी मगदूम, भगवान काटे, उपमहापौर शमा मुल्ला, वसंत मुळीक, दीपा मगदूम, विक्रम जरग, बाबा पार्टे, मुरलीधर जाधव, भाजपचे महेश जाधव, संदिप देसाई, गणी आजरेकर, सुभाष देसाई, राजू लाटकर आदी उपस्थित होते.
काँग्रेसचे नेते अनुपस्थित
सत्कार समारंभास राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील हे अनुपस्थित होते. मुश्रीफ परदेशी गेल्याने व सतेज पाटील कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने समारंभास येऊ शकले नाहीत असे स्पष्टीकरण महापौरांनी केले.
मराठी पाऊल पडते पुढे..
संभाजीराजे यांचा सत्कार होत असताना ‘मराठी पाऊल पडते पुढे...वाजती तोफांचे चौघडे..’हे गाणे लावण्यात आले होते.
‘जय भवानी..जय शिवाजी’च्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले. मुख्य समारंभानंतर संभाजीराजेंंना भेटून शुभेच्छा देण्यासाठी लोकांची झुंबड उडाली.
चंदगड साठी २० कोटींचा प्रकल्प
शिव-शाहू अॅग्रो कंपनी स्थापन करून संभाजीराजे चंदगड तालुक्यात २० कोटी रुपयांचा प्रकल्प राबविणार असल्याची माहिती सत्कारापूर्वी देण्यात आली.