महापालिका क्षेत्रात पॉझिटिव्हीटी व मृत्यू दरात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:18 AM2021-06-26T04:18:24+5:302021-06-26T04:18:24+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील नव्याने आढळून येणाऱ्या कोराेना बाधितांची टक्केवारी तसेच मृत्यूचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात घटले असल्याचे दावा ...

Decrease in positivity and mortality in municipal area | महापालिका क्षेत्रात पॉझिटिव्हीटी व मृत्यू दरात घट

महापालिका क्षेत्रात पॉझिटिव्हीटी व मृत्यू दरात घट

Next

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील नव्याने आढळून येणाऱ्या कोराेना बाधितांची टक्केवारी तसेच मृत्यूचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात घटले असल्याचे दावा शुक्रवारी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

महानगरपालिका प्रशासनाने कोरोनाला प्रतिबंध करताना केलेल्या विविध उपाययोजना, प्रतिदिन चाचण्यांची वाढविलेली संख्या यामुळे शहरातील टक्केवारी घटण्यास मदत झाली असल्याचे बलकवडे यांनी सांगितले. शहरात जरी रोज चारशेच्या आसपास नवीन रुग्ण आढळत असले तरी चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे बाधितांचे प्रमाण घटत असल्याचे दिसते, असे त्यांनी स्पष्ट केले.

अनलॉक करण्यासाठी राज्य सरकारने ठरविलेल्या निकषात जर कोल्हापूर शहर बसत असेल तर सोमवारपासून शहरातील लाॅकडाऊन संबंधीचे निर्बंध शिथिल करणार का अशी विचारणा करता बलकवडे यांनी सांगितले की, ‘नव्याने बाधीत होण्याचे प्रमाण घटले आहे, मृत्यूचे प्रमाण घटले आहे हे जरी खरे असले तरी निर्बंध शिथिल करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीला आहे. त्यामुळे ही समिती निर्णय घेईल. समितीचे बैठक अजून झालेली नाही.’

सोमवारपासून दुकाने सुरु करण्याचा निर्धार व्यापारी संघटनांनी केला आहे याकडे लक्ष वेधले असता त्यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या निकषानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती जो निर्णय घेईल, त्याची अंमलबजावणी करण्याची आमची जबाबदारी आहे. जर निर्बंध कायम राहिले तर दुकाने उघडता येणार नाहीत. व्यापाऱ्यांनी या निर्णयाकडे योग्य पध्दतीने पाहावे.

कोरोनामुळे व्यवसाय झाला नसल्याने पाणी बिलात तसेच घरफाळ्यात सवलत द्यावी अशी विनंती व्यापारी संघटनांनी केली आहे. हा विषय आर्थिक बाबीशी निगडित असल्याने तपासून पाहून त्यावर निर्णय घेतला जाईल, असे बलकवडे यांनी सांगितले.

पॉईंटर -

- १ जानेवारीपासून झालेल्या चाचण्यांची संख्या - २ लाख ३० हजार २५५

- १ जानेवारी ते जून २०२१ आढळलेले रुग्ण - २० हजार ३८९

- आरटीपीसीआरमधील नवीन कोरोना रुग्णांची टक्केवारी - ७.७४

- ॲन्टिजनमधील नवीन कोरोना रुग्णांची टक्केवारी - ३.२१

- जानेवारीत असलेला २.९२ टक्के मृत्यू दर जूनमध्ये ०.९३ पर्यंत खाली घसरल

- ऑक्सिजेन बेडवर असलेल्या रुग्णांची संख्या - २३३ (१२ टक्के)

- आयसीयूमधील बेडवर असलेल्या रुग्णांची संख्या - ४६ (३ टक्के)

-मला अधिकार नाहीत-

दहा लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या शहरात स्थानिक परिस्थिती पाहून निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना दिले आहेत. परंतु कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील लोकसंख्या दहा लाखांच्या आतील असल्यामुळे मला स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याचे बलकवडे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Decrease in positivity and mortality in municipal area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.