ऊस क्षेत्रात होणार घट

By admin | Published: December 13, 2015 11:03 PM2015-12-13T23:03:04+5:302015-12-14T00:07:13+5:30

आजरा तालुका : पर्यायी पिकांना प्राधान्य

Decrease in the sugarcane area | ऊस क्षेत्रात होणार घट

ऊस क्षेत्रात होणार घट

Next

ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा यावर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण, पाण्याअभावी ऊस पिकाच्या वजनामध्ये झालेली घट, वन्य प्राण्यांकडून होणारे पिकांचे नुकसान, उपसाबंदीचे संकट व पर्यायी भात पिकास मिळणारे घसघशीत दर यामुळे आजरा तालुक्यात ऊस क्षेत्रात यावर्षी घट होणार हे स्पष्ट होऊ लागले आहे.आजरा तालुक्यातून सुमारे पावणेदोन लाख टन ऊस उत्पादित होतो. त्यातील सरासरी ६० हजार टन ऊस प्रतिवर्षी बाहेरच्या साखर कारखान्यांना जातो. हा धोका स्थानिक आजरा साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने ओळखून बाहेरच्या तालुक्यातील उसाला गाळपासाठी गेले चार वर्षे प्राधान्य दिले आहे. या प्रकारामुळे स्थानिक ऊस उचल करण्याचे नियोजन कोलमडते. परिणामी, तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.वर्षभर कष्ट करून पदरात काही पडेल याची खात्री उसाबाबत नाही, तर चार महिन्यांत भात पीक घेऊन घसघशीत उत्पन्न मिळण्याची हमी, असे चित्र असल्याने तालुक्यात यापुढे ऊस उत्पादन घटणार हे स्पष्ट आहे.

एकीकडे ऊस उचल करण्यासाठी शेतकऱ्यांची होत असलेली दमछाक, दरासाठी करावा लागणारा संघर्ष असे चित्र असताना दुसरीकडे भात पिकास मिळणारा घसघशीत दर, दारापर्यंत येऊन उचलीसाठी व्यापाऱ्यांकडूनच केली जाणारी धडपड, असा विरोधाभास दिसत आहे. हा विरोधाभासही उसाचे उत्पादन कमी होण्यास कारणीभूत ठरू लागला आहे.

तांदूळ विक्री केंद्रांत वाढ
ऊस उत्पादकांसमोर ऊस उचल करण्यासाठी ऊसतोड टोळ्यांकडे करावी लागणारी विनवणी, शेती सेंटर आॅफिसला मारावे लागणारे खेटे, शेवटच्या टप्प्यात ऊसतोड टोळ्यांना द्यावी लागणारी भरमसाठ स्वरूपातील खुशाली, अशा सर्व प्रकारांना सामोरे जाण्याचे धाडसही हळूहळू कमी होऊ लागले आहे. एकीकडे ऊस उत्पादकांची अवस्था अशी असताना दुसरीकडे भात पिकाला मात्र चांगले दिवस येऊ लागले आहेत. घनसाळसारख्या भाताला विक्रमी ३५०० पर्यंत प्रतिक्विंटल दर मिळू लागला आहे. दिवसेंदिवस पर्यटकांच्या वाढत्या मागणीमुळे ठिकठिकाणी तांदूळ विक्री केंद्रे उघडली जात आहेत. भात उत्पादकांच्या बांधावर जाऊन व्यापारी वर्ग भात खरेदी करू लागला आहे.


जंगलामध्ये पाण्याचे संपत आलेले साठे आणि चाऱ्याची निर्माण झालेली टंचाई यामुळे वन्य प्राण्यांनी शेतातील पिके आपले लक्ष्य बनविले आहे. परिणामी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हतबल होऊन पिकांचे होणारे नुकसान बघत बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. साधारणत: आॅक्टोबर महिन्यापासून वन्य प्राण्यांचा त्रास होतो.

पाणीटंचाईचे संकट : पिकासाठी पाणी कोठून आणणार?
यावर्षी तर तालुक्यात पाणीटंचाईचे भीषण संकट आहे. महसूलकडून पाणी उपसाबंदीचे हत्यार उपसले जात आहे. पाण्याचे साठे कोरडे पडू लागले आहेत. अशावेळी पिकासाठी पाणी कोठून आणायचे? हा प्रश्न आतापासून शेतकऱ्यांना सतावू लागला आहे. पाणीच नसेल, तर ऊस कसा घ्यायचा? हा प्रश्नही बोलका आहे.

Web Title: Decrease in the sugarcane area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.