युती तुटल्याने भाजपाच्या अडचणी वाढल्या
By admin | Published: January 27, 2017 06:37 PM2017-01-27T18:37:44+5:302017-01-27T18:37:44+5:30
शिवसेनेचे भाजपशी पुरते बिनसले आहे, तर ‘स्वाभिमानी’चे राजू शेट्टी हे त्याच वाटेवर आहेत.अशी माहिती समोर आली आहे.
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर : शिवसेनेचे भाजपशी पुरते बिनसले आहे, तर ‘स्वाभिमानी’चे राजू शेट्टी हे त्याच वाटेवर आहेत. त्यांनी फक्त अजून घोषणा केलेली नाही; परंतु भाजपा आघाडी (भाजपा, जनसुराज्य आणि महाडिक यांची ताराराणी आघाडी) आणि दोन्ही काँग्रेस आघाडी प्रत्येकी २५ अशा ५० जागांवर थांबली आणि त्यातही शिवसेना व ‘स्वाभिमानी’ला मानणारे असे १५ ते २० सदस्य निवडून आले तर सत्ता नेमकी कुणाच्या हातात द्यायची याचा निर्णय शिवसेना आणि स्वाभिमानीच्या हातात असू शकेल. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत सत्तेपर्यंत जाण्याच्या भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत.
भाजपा व शिवसेना हे पक्ष राज्यात सत्तेत असले तरी त्यांचे जिल्ह्याच्या राजकारणात कधी सख्य नव्हतेच. त्यात महापालिकेच्या निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला बाजू सारुन माजी आमदार महादेव महाडिक यांना काखेत घेतल्यामुळे या दोन मित्रपक्षांतला दुरावा वाढला होता. नगरपालिकेच्या निवडणुकीतही तोच कित्ता पुढे सुरु राहिला. आताही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांची युती होण्याची चिन्हे नव्हतीच. कारण शिवसेनेशी कोणतीही चर्चा होण्यापूर्वीच पालकमंत्री पाटील यांनी गेल्या रविवारीच भाजपा आघाडीचे जागा वाटप जाहीर केले.
त्यावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी जोरदार टीका केली होती. आम्हांला जागा देणारे दादा कोण अशी रोखठोख विचारणा त्यांनी केली होती. परंतु तरीही मुंबई महापालिकेत काय होते. याकडे दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे लक्ष होते. तिथेही शिवसेनेने स्वत:हूनच स्वबळावर लढण्याचे गुरुवारी जाहीर केले. परिणामी जिल्ह्याच्या राजकारणातही या दोन पक्षांच्या वाटा वेगळ्या झाल्या.
अशीच काहीशी स्थिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचीही आहे. त्यांनीही भाजपापासून बाजूला जाऊन काही ठिकाणी काँग्रेसशी हातमिळवणी करून तर शिरोळमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. स्वाभिमानी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात संघर्षाची वात लावण्याचे काम भाजपा करत असल्याचा शेट्टी यांचा आरोप आहे. त्याशिवाय महाडिक व जनसुराज्य शक्तीचे नेते विनय कोरे यांना पायघड्या घालणारे भाजपावाले स्वाभिमानी संघटनेशी साधी चर्चाही करायला तयार नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे संघटनेनेही आता काही करुन भाजपाला जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून रोखण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
मावळत्या जिल्हा परिषदेत ६९ पैकी सहा सदस्य शिवसेनेचे होते. आता परिस्थिती बदलली आहे. या सहा आमदारांच्या कार्यक्षेत्राबरोबरच काँग्रेसमधून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय मंडलिक शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांचा कागलमध्ये स्वतंत्र गट आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबा कुपेकर यांचे पुतणे संग्राम शिवसेनेत आहेत. दोन्ही काँग्रेसच्या अंतर्गत राजकीय कुरघोड्यांमध्ये ज्या आमदारांचे साधले होते त्यांची आता खरी ताकद या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिसणार आहे.