अभियांत्रिकी प्रवेशाच्या संधी घटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 01:01 AM2019-02-03T01:01:30+5:302019-02-03T01:01:45+5:30
संतोष मिठारी । कोल्हापूर : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रवेशाचा कोटा १० टक्क्यांवर ...
संतोष मिठारी ।
कोल्हापूर : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रवेशाचा कोटा १० टक्क्यांवर आणण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. त्यामुळे या प्रवेशाच्या संधी कमी होणार आहेत. या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी तंत्रनिकेतनमधील शिक्षक, विद्यार्थ्यांकडून होत आहे.
देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशासाठी जागा रिक्त असल्याच्या कारणावरून ‘एआयसीटीई’ने अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमानंतर पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशाकरिता सध्या असणारा २० टक्के जागांचा कोटा आता १० टक्क्यांवर आणला आहे. एका अभियंत्याबरोबर (इंजिनिअर) सात पदविकाधारक आणि त्यांच्यानंतर १९ कामगार असे साधारणत: प्रमाण आहे. मात्र, सध्या हे प्रमाण बिघडले आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत पदविकाधारकांचे प्रमाण कमी आहे. पदविका अभ्यासक्रमानंतर बहुतांश विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेशित होतात. तीन वर्षांची पदविका पूर्ण केल्यानंतर पदवीसाठी थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळत असल्याने, पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणे सोईस्कर व्हावे, या उद्देशाने दहावीनंतर विद्यार्थी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. पदविका अभ्यासक्रमानंतर पदवीसाठी प्रवेशित होताना प्रवेश परीक्षा द्यावी लागत नसल्याने अनेक विद्यार्थी दहावीनंतरचा पदविका करण्यास प्राधान्य देतात.
आधी निर्णय व्हावा
पदविका अभ्यासक्रमांचे ९० टक्के विद्यार्थी पदवीसाठी प्रवेशित होतात. त्यांच्यासाठी हा निर्णय अन्यायकारक असल्याचे अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई यांनी सांगितले. ते म्हणाले, कोटा कमी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तीन वर्षे आधी निर्णय जाहीर करणे आवश्यक होते.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
महाराष्ट्रातील तंत्रनिकेतन महाविद्यालयांची संख्या : ४५०
प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणारे
विद्यार्थी : सुमारे दीड लाख
शिक्षण घेणारे एकूण विद्यार्थी : सुमारे साडेचार लाख
कोल्हापुरातील तंत्रनिकेतनची
संख्या : २३
विद्यार्थ्यांची संख्या : १४,०००
पदविका प्रवेशाच्या जागा घटविण्याच्या निर्णयामुळे पदवी प्रवेशासाठी चांगल्या महाविद्यालयातील प्रवेशाच्या संधी कमी होणार आहेत.
- डॉ. महादेव नरके, प्राचार्य,
डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक.
दहावीनंतर व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी शासन आणि व्यावसायिक संस्थांद्वारे राबविण्यात येत असलेली मोहीम पाहता, ‘एआयसीटीई’चा सदरचा निर्णय विद्यार्थी, पदविका संस्थाचालकांच्या दृष्टीने निराशाजनक आहे.
- दिग्विजय पवार, प्राचार्य,वाय. डी. माने इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, कागल.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
महाराष्ट्रातील तंत्रनिकेतन महाविद्यालयांची संख्या : ४५०
प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणारे
विद्यार्थी : सुमारे दीड लाख
शिक्षण घेणारे एकूण विद्यार्थी : सुमारे साडेचार लाख
कोल्हापुरातील तंत्रनिकेतनची
संख्या : २३
विद्यार्थ्यांची संख्या : १४,०००