कसबा बावड्यातील कोविड अलगीकरण केंद्राचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 06:36 PM2021-06-13T18:36:06+5:302021-06-13T18:37:02+5:30
CoronaVirus In Kolhapur : पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या कसबा बावडा येथे १६२ बेड क्षमतेच्या कोविड अलगीकरण केंद्राचे लोकार्पण रविवारी झाले. आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते लोकार्पण झाले. श्रीराम सोसायटी, महापालिकेच्या सहकार्याने केंद्र उभारण्यात आले आहे.
कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या कसबा बावडा येथे १६२ बेड क्षमतेच्या कोविड अलगीकरण केंद्राचे लोकार्पण रविवारी झाले. आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते लोकार्पण झाले. श्रीराम सोसायटी, महापालिकेच्या सहकार्याने केंद्र उभारण्यात आले आहे.
केंद्रात महिलांसाठी ५० आणि पुरूषांसाठी ११२ अशा एकूण १६२ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे अनेक चांगल्या सुविधा दिली जात आहेत. बऱ्याच लोकांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने ते रुग्ण घरातच राहून उपचार घेण्याकडे प्राधान्य देत आहेत. परंतु, घरी अलगीकरणाची पुरेशी सोय नसल्याने कळत नकळत संपर्कात आल्यामुळे घरातील अन्य लोकांना संसर्ग होत आहे. यामुळे काही ठिकाणी कुटुंबातील अनेक लोक बाधित झाल्याचे चित्र आहे. यामुळे हे अलगीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले, कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसताच तत्काळ कोरोना चाचणी करून कोरोना केंद्र किंवा रुग्णालयात दाखल व्हावे. ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांनी या केंद्रामध्ये येऊन उपचार घ्यावेत. जेणेकरून आपल्या घरातील इतर सर्व लोक सुरक्षित राहू शकतील.
सौम्य लक्षणे असणारे सर्व रुग्ण या केंद्रांमध्ये यावेत, यासाठी कसबा बावडा येथील प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक मंडळाचा एक कार्यकर्ता घेऊन गल्ली समिती स्थापन करण्यात येणार आहे. कसबा बावडा परिसर कोरोनामुक्त करण्याठी प्रत्येक गल्लीतील नागरिकांचे प्रबोधन करण्याबाबत सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
लोकार्पण कार्यक्रमास आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, श्री राम संस्थेचे सभापती हरी पाटील, उपसभापती संतोष पाटील, सेंटर समन्वयक गजानन बेडेकर, महापालिका उपअभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका, महापालिकेचे अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.