एकाच बसचे दोनदा लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:18 AM2021-06-26T04:18:18+5:302021-06-26T04:18:18+5:30
कोल्हापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या ताफ्यात आलेल्या ४० लाखांच्या अत्याधुनिक 'मोबाइल मेडिकल युनिट बसचे दोनदा ...
कोल्हापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या ताफ्यात आलेल्या ४० लाखांच्या अत्याधुनिक 'मोबाइल मेडिकल युनिट बसचे दोनदा उदघाटन झाले. शुक्रवारी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बसचे लोकार्पण केले. तत्पूर्वी ६ जून रोजी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात हाच सोहळा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाला होता. जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणांनी सज्ज अशी मोबाइल मेडिकल युनिट बस कोल्हापुरात दाखल झाली. याचे लोकार्पण यापूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले होते, त्यानंतर ही बस तीन तालुक्यांमध्ये फिरूनदेखील आली, त्याद्वारे नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात आल्या. शुक्रवारी पुन्हा शेंडापार्क येथील आरोग्य केंद्रात मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पुन्हा त्याचे लोकार्पण करण्यात आले. एकाच बसचे दोनदा झालेल्या या सोहळ्याची चर्चा मात्र जिल्ह्यात सर्वत्र सुरू होती.
या कार्यक्रमासाठी अर्जुन आबिटकर, राज्य कुटुंब कल्याण उपसंचालक डॉ. राम हंकारे, उपसंचालक डॉ. उज्ज्वला माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . उषादेवी कुंभार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, प्राचार्य सुप्रिया देशमुख, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ फारुख देसाई उपस्थित होते.
--
फोटो नं २५०६२०२१-कोल-मोबाइल व्हॅन
ओळ : कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते मोबाईल मेडिकल युनिटचे लोकार्पण करण्यात आले.
--