दीपा मलिक यांचे ‘हेल्पर्स’शी दृढ नाते
By admin | Published: September 14, 2016 12:19 AM2016-09-14T00:19:23+5:302016-09-14T00:46:25+5:30
मुलांना प्रेरणा : २०१० साली संस्थेच्या वसतिगृहातील मुलांसोबत घालविला होता काही वेळ
कोल्हापूर : रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू असा इतिहास रचणाऱ्या दीपा मलिक यांचे कोल्हापुरातील ‘हेल्पर्स आॅफ दी हॅँडिकॅप्ड’ या संस्थेशी दृढ असे नाते आहे.
गो-कार्टिंग रेसमध्ये सहभागी होणाऱ्या आपल्या मुलीसोबत त्या २०१० साली कोल्हापुरात आल्या असता हॉटेल वा लॉजिंगमध्ये न उतरता ‘हेल्पर्स’मधील मुलांसोबत त्यांनी वेळ घालविणे पसंद केले. दोन दिवसांच्या
सहवासात त्यांनी वसतिगृहातील मुलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
दीपा यांच्या कमरेखालील भाग अर्धांगवायूग्रस्त आहे. पाठीच्या कण्यातील ट्यूमरमुळे सतरा वर्षांपूर्वी त्यांचे चालणे-फिरणे बंद झाले. आतापर्यंत त्यांच्यावर तब्बल एकतीस वेळा शस्त्रक्रिया झाली आहे; परंतु अपंगत्वाने खचून न जाता नव्या जिद्दीने त्यांनी आयुष्याला तोंड दिले आहे. त्यांना आलेले अनुभव, आजारपणावर मात करीत थाळीफेक व गोळाफेकचा केलेला सराव यासंबंधी माहिती देत मुलांशी संवाद साधला होता. २०११ साली झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत थाळीफेक व गोळाफेकमध्ये त्यांनी रौप्यपदक पटकाविले आहे. आजारपणामुळे खचून न जाता त्यातून बाहेर कसे पडायचे व आपले भवितव्य कसे घडवायचे यासंबंधी त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच ‘प्रयत्न केल्यास काहीही अशक्य नाही’ असा संदेश दिला. ‘हेल्पर्स’तर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली
व संस्थेच्या शिवणकाम विभागाला भेट देऊन मुलांनी तयार
केलेल्या कलात्मक शिलाईचे कौतुक केले.
त्यावेळी दीपा यांनी दाखविलेल्या स्वत:च्या जीवनप्रवासावर आधारित माहितीपटाने वसतिगृहातील मुलांना प्रेरणा मिळाल्याचे ‘हेल्पर्स आॅफ दि हॅँडिकॅप’ संस्थेचे वर्क्स
मॅनेजर अविनाश कुलकर्णी यांनी सांगितले.
२०१० साली दीपा मलिक कोल्हापुरात आल्या असता ‘हेल्पर्स आॅफ दी हॅँडकॅप्ड’ संस्थेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले होते.