अंबाबाईच्या भाविकांसाठी रिक्षावाहतुकीचीही सेवा - पालकमंत्री दीपक केसरकर
By संदीप आडनाईक | Published: September 25, 2022 04:53 PM2022-09-25T16:53:41+5:302022-09-25T16:54:18+5:30
अंबाबाईच्या भाविकांसाठी रिक्षावाहतुकीचीही सेवा देणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
कोल्हापूर : अंबाबाईच्या दर्शनाला सुमारे २५ लाख भाविक पर्यटक नवरात्रीत कोल्हापूरला येतील. त्यांच्यासाठी १२ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था केली आहे. एसटीची व्यवस्था केली आहे, तसेच दर दहा मिनिटाला केएमटीची सेवाही देण्यात येणार आहे. याशिवाय रिक्षा असोसिएशनशी चर्चा करून शासनाच्या खर्चाने भाविकांच्या सेवेत काही रिक्षावाहतुकीचीही सेवा देण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूरचे नूतन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी दिली.
पालकमंत्री म्हणून घोषणा होताच रत्नागिरीहून कोल्हापूरच्या संपर्कदौऱ्यावर आलेले मंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी सकाळी अंबाबाई आणि श्रीक्षेत्र जोतिबाचे दर्शन घेतले. अंबाबाई मंदिराच्या आवारात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्हा नियोजन समितीशी, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांशी धावती भेट घेउन नवरात्रीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत खासदार धैर्यशील माने होते.
नवरात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका काढण्यात येणार आहे. त्याची छपाई तात्काळ पूर्ण करण्यात येईल असे सांगून केसरकर यांनी भाविक, देवस्थान समिती, महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने नवरात्रउत्सव निर्विघ्नपणे पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली. पूर्वतयारी पूर्ण झाली असून सुविधा कमी पडणार नाहीत, मात्र भाविकांनी रांगेतून दर्शन घ्यावे असेही आवाहन केले.
बहुमजली स्वच्छतागृहासाठी प्रयत्न
अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात आलेल्या भाविकांच्या स्वच्छतागृहाची नवरात्रोत्सवात तात्पुरती व्यवस्था करण्यात येईल. जागेची उपलब्धता होताच तीनमजली शोभिवंत स्वच्छतागृह आणि स्नानगृहासाठी पालकमंत्री म्हणून मी निधी उपलब्ध करून देईन. यामध्ये स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल, असे केसरकर यांनी सांगितले. वज्रलेपाविषयी विचारलेल्या प्रश्नांवर विनाकारण वाद टाळूया असे सांगून न्यायालयात प्रलंबित या प्रश्नांवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
कोल्हापुरातील वारसास्थळांची जपणूक करणार
मला कोल्हापूरचा विकास करायचा आहे, कोल्हापुरात जयपूरच्या धर्तीवर पर्यटन विकास करणार असून चंदगडपासून पन्हाळ्यापर्यंत पर्यटकांचा ओघ वाढेल असे दीपक केसरकर यांनी सांगितले. कोल्हापुरातील अनेक शासकीय कार्यालये, शाळा या हेरिटेज वास्तूंमध्ये आहे. यासाठी हेरिटेज वॉकचे आयोजन करणार असून हब तयार करून कोल्हापूरचे वैभव जपण्यासाठी नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अंबाबाई मंदिरापासून न्यू पॅलेसपर्यंत, शिवाजी पूल, रंकाळासारख्या तलावांच्या काठावर विद्युत रोषणाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.