नव्या संसदेसाठी कोल्हापूरच्या ‘सांगलीकरां’चे योगदान; पितापुत्रांनी केले ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर काम
By समीर देशपांडे | Published: September 21, 2023 12:14 PM2023-09-21T12:14:48+5:302023-09-21T12:15:26+5:30
केवळ १५ दिवसांत करून दिले काम
समीर देशपांडे
कोल्हापूर : गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर ‘सेंट्रल व्हिस्टा’ या नवीन इमारतीमध्ये भारताच्या संसदेचे कामकाज सुरू झाले. ही इमारत बांधण्याआधीपासूनच चर्चेत आली होती. या बहुचर्चित इमारतीच्या बांधकामामध्ये खारीचा वाटा कोल्हापूरमधील अभियंता, कारखानदार दीपक सांगलीकर आणि गौरव सांगलीकर यांच्या कंपनीने उचलला आहे.
या इमारतीसाठी जे अष्टकोनी स्तंभ उभारायचे होते. त्याचे साचे तयार करायचे होते. या कामाचा ठेका घेतलेल्या टाटा प्रोजेक्टसकडून यासाठी येथील गोकुळ शिरगाव लघु औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या दीपक सांगलीकर यांच्या ‘टेक्नोज न प्लास्टोज’ कंपनीकडे ऑक्टोबर २०२१ मध्ये विचारणा करण्यात आली. हे काम घेतल्यानंतर जे कामासाठी किमान ६ ते आठ आठवडे लागतात. ते काम सांगलीकर आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी केवळ १५ दिवसांत करून दिले.
हे साचे इतक्या उत्तम दर्जाचे बनवले होते की या अष्टकोनी स्तंभांचे ‘फिनिशिंग’ चांगले आणि अतिशय कमी कालावधीत झाल्याचा अभिप्राय सांगलीकर यांना मिळाला. देशाच्या इतिहासात मोठे स्थान मिळवणारी ही इमारत उभी करण्यामध्ये आपले योगदान म्हणून सांगलीकर पितापुत्रांनी हे काम ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर करून आपली मानसिकताही यातून दाखवून दिली. अशा पद्धतीने कोल्हापूरच्या कारखानदारांनाही या इमारतीच्या बांधकामामध्ये योगदान देता आले.
एल ॲन्ड टी कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्याकडे काम करून घेतले होते. ते सध्या या टाटा प्रोजेक्टसमध्ये काम करतात. त्यांनीच या कामासाठी आमच्या कंपनीची निवड केली. देशाच्या संसद भवनाच्या इमारतीच्या कामामध्ये आम्हांला खारीचा वाटा उचलता आला याचे समाधान आणि अभिमान वाटतो. - दीपक सांगलीकर, गौरव सांगलीकर,