‘दीपोत्सव’ सृजनशील पत्रकारितेचा आदर्श
By admin | Published: November 6, 2015 12:26 AM2015-11-06T00:26:24+5:302015-11-06T00:32:51+5:30
मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना : ‘लोकमत’च्या दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन
कोल्हापूर : वाचक घडविणारी व संस्कार करणारी साप्ताहिके, मासिके आता संपली आहेत; पण जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत भाषा मरत नसते. लेखक देतील तो मजकूर छापण्याऐवजी एखादी संकल्पना घेऊन निघणारा ‘लोकमत’चा ‘दीपोत्सव’ हा अंक सृजनशील, संशोधनात्मक आणि पत्रकारितेतला उत्तम आदर्श निर्माण करणारा आहे, असे मत लेखक कृष्णात खोत यांनी व्यक्त केले.
‘लोकमत’च्या ‘दीपोत्सव’ दिवाळी अंकाचे प्रकाशन गुरुवारी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयात झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे, गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयाच्या प्रशासन अधिकारी मंजिरी देसाई, नूतन नगरसेविका उमा इंगळे, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, सहाय्यक सरव्यवस्थापक (वितरण) संजय पाटील उपस्थित होते.
खोत म्हणाले, दिवाळी अंकाला मोठी परंपरा आहे. मी स्वत: दिवाळी अंकात लेखन करून पुढे आलो; पण कालौघात भाषा कधी नष्ट झाली नाही. ती नवी येते, जुनी असते, आजच्या परिस्थितीत वाचनसंस्कृतीची बिकट वाट सुरू आहे. त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य ‘लोकमत’च्या ‘दीपोत्सव’मध्ये आहे. खेड्यात अजूनही दिवाळी अंक, विविध साप्ताहिके, मासिके वाचली जातात. त्यांची भूक भागविली गेली पाहिजे. त्यासाठी वाचन कार्यशाळा घेतली गेली पाहिजे. कारण वाचनसंस्कृती वाढली तरच आपल्या जगण्याला नवा अर्थ आहे.
शुभांगी गावडे म्हणाल्या, ‘लोकमत’चे अंक आम्ही महाविद्यालयात संदर्भासाठी जपून ठेवतो. सध्या ई-माध्यमे, गॅझेटसचा जमाना आहे. त्यामुळे तरुणपिढी सामाजिक भान विसरत चालली आहे. आपली चौकस बुद्धी गंजत चालली आहे. अशा परिस्थितीत हा दिवाळी अंक नवीन वाचकांना आणि चांगल्या लेखकांना जोडणारा दुवा ठरला
आहे.
मंजिरी देसाई यांनीही ‘दीपोत्सव’ला शुभेच्छा देत हा अंक महाविद्यालयात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात संपादक वसंत भोसले म्हणाले, देशात दिवाळी अंकाची मोठी परंपरा आहे. त्यात ‘लोकमत’चा दिवाळी अंक अग्रेसर आहे. आवृत्तीनिहाय दिवाळी अंकासोबतच महाराष्ट्र, देश आणि परदेशातील मराठी वाचकांना एकत्र आणणारा ‘दीपोत्सव’ हा अंक प्रसिद्ध केला जातो. गतवर्षी अंकाच्या १ लाख १ हजार १६७ प्रतींची विक्री झाली असून तो दिवाळी अंकांच्या इतिहासातला विक्रमच ठरला आहे. यंदा दीड लाख अंकांची मागणी आली आहे. ‘जिथे मराठी तिथे लोकमत’ असे ‘लोकमत’चे ब्रीद असून हा दीपोत्सव अंक दर्जेदार निघण्यासाठी वर्षभर काम चालते.
नूतन नगरसेविका उमा इंगळे यांनीही दीपोत्सव अंकाला शुभेच्छा दिल्या. सखी मंच संयोजिका प्रिया दंडगे यांनी सूत्रसंचालन केले. वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी मान्यवरांचे आभार मानले.