कोल्हापुरात शिवरायांच्या पुतळा विटंबनेचे पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 12:08 PM2021-12-18T12:08:51+5:302021-12-18T12:09:53+5:30
कर्नाटकातील बंगळुरूजवळील सदाशिवनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची बातमी समाजमाध्यमांवर व्हायरल होताच त्याचे पडसाद शुक्रवारी रात्री कोल्हापुरात उमटले.
कोल्हापूर : कर्नाटकातील बंगळुरूजवळील सदाशिवनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची बातमी समाजमाध्यमांवर व्हायरल होताच त्याचे पडसाद शुक्रवारी रात्री कोल्हापुरात उमटले. संतप्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घोषणा देत कोल्हापूर परिसरातील कन्नड भाषिकांची हॉटेल्स तसेच दुकाने बंद पाडली. दरम्यान, शहरात सर्वत्र बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावरून दोन राज्यांतील वातावरण तापले आहे. बेळगाव येथे भरलेल्या अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित केलेला महामेळावा कर्नाटक प्रशासनाने बंद पाडला; तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांना कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. त्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात जोरदार निदर्शने झाली होती.
शुक्रवारी रात्री समाजमाध्यमांवर कर्नाटकातील काही तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला काळे फासल्याचा फोटो व्हायरल केला. त्याखाली ‘कॉंग्रॅच्युलेशन्स ब्रदर’ असा मजकुूर लिहिला आहे. बंगळुरूमधील सदाशिवनगर येथील हा पुतळा असल्याचे वृत्त आहे. हा फोटो पाहून कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी मध्यवर्ती शिवाजी महाराज चौकात धाव घेतली. तेथे महाराजांच्या पुतळ्यास आधी जलाभिषक व नंतर दुग्धाभिषेक केला.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव अशा घोषणा देत विजय दरवान, प्रणव पाटील, प्रदीप हांडे, शुभम जाधव यांच्यासह कार्यकर्ते शहरभर विखुरले. त्यांनी शहरात जी जी कर्नाटकातील व्यावसायिकांची दुकाने होती, ती ती बंद पाडण्यास सुरुवात केली. लक्ष्मीपुरीतील प्रार्थना हॉटेल, तर कळंबा रोड परिसरातील एक उडपी हॉटेल बंद पाडले. कार्यकर्ते घोषणा देत जसे शहरभर फिरतील तसे पोलीस यंत्रणाही सतर्क झाली. बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
औरंगजेबाच्या राज्यात मोगलांना जमले नाही, तो नीचपणा भाजपच्या राज्यात कानडी नालायकांनी केला आहे. या कानड्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा शिवसेनेचे हर्षल सुर्वे यांनी दिला आहे.