शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना : केंद्र सरकारने दखल घ्यावी, खासदार संभाजीराजेंची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 12:38 PM2021-12-18T12:38:07+5:302021-12-18T12:42:47+5:30
बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. या संपूर्ण प्रकाराची केंद्र आणि राज्य सरकारने चौकशी करावी.
कोल्हापूर : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटू लागले आहेत. यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ही ट्विट करत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. तर या प्रकरणाची केंद्र आणि कर्नाटक सरकारने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.
खासदार संभाजीराजे म्हणाले, संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. या संपूर्ण प्रकाराची केंद्र आणि राज्य सरकारने चौकशी करावी. असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी. @PMOIndia@BSBommai
दरम्यान या घटनेनंतर कोल्हापूरसह सांगली, मिरज परिसरात संतप्त शिवसैनिकांनी कर्नाटकचे फलक असलेले सर्व व्यवसाय बंद पाडले. मिरजेत तर कर्नाटकच्या गाड्या फोडल्या. यामुळे तणावाचे वातावरण बनले आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी शहरातील सर्वच मुख्य चौकात कडक बंदोबस्त तैनात केला आहे.