आदेश पाहून दोषारोप निश्चिती:: गोविंद पानसरे हत्या प्रकरण

By admin | Published: April 30, 2016 12:15 AM2016-04-30T00:15:06+5:302016-04-30T00:41:16+5:30

जिल्हा व सत्र न्यायालयाची माहिती : सुनावणी तहकूब; ४ मे रोजी होणार निर्णय

Defamation verdict after order: Govind Pansare murder case | आदेश पाहून दोषारोप निश्चिती:: गोविंद पानसरे हत्या प्रकरण

आदेश पाहून दोषारोप निश्चिती:: गोविंद पानसरे हत्या प्रकरण

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या विरोधात दोषारोप पत्र निश्चित करण्याचे सर्वाधिकार सत्र न्यायालयास आहेत, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाची प्रत पाहून दि. ४ मे रोजीच्या सुनावणीमध्ये दोषारोप केव्हा निश्चित करायचे यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, तोपर्यंत सुनावणी तहकूब ठेवण्याचा निर्णय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी शुक्रवारी घेतला. संशयित गायकवाडला कारागृहातून सशस्त्र पोलिस बंदोबस्तात न्यायालयात आणले होते.
पानसरे खटल्यातील आरोपी समीर गायकवाड याच्याविरोधात दोषारोप पत्र निश्चित करण्यासाठी शुक्रवारी दुपारी जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश बिले यांच्या दालनात सुनावणी झाली. यावेळी ज्येष्ठ विशेष सरकारी वकील हर्षल निंबाळकर यांनी दि. २७ एप्रिलला उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये समीर गायकवाडच्या विरोधात दोषारोप पत्र निश्चित करायचे की नाही, याचे सर्वाधिकार सत्र न्यायालयास आहेत.
आम्ही या खटल्यामध्ये हस्तक्षेप करत नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोषारोपासंदर्भात तुम्ही निर्णय घ्यावा; परंतु आमची विनंती राहील की, पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर व डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार सीबीआय, एसआयटी व सीआयडी (कर्नाटक) यांच्यात समन्वयाने सुरू आहे. न्यायालयाने या तपास यंत्रणेला दि. ३ मेपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. समीर गायकवाड याच्या जामीन अर्जावर दि. ६ मे रोजी सुनावणी आहे. त्यामुळे या दोन्ही सुनावणीनंतर दि. ११ मे रोजी दोषारोप निश्चित करण्यासाठी सुनावणी ठेवावी, अशी विनंती केली.
त्यावर समीरचे वकील समीर पटवर्धन यांनी माझी कोणतीच हरकत नसल्याचे सांगितले. न्यायाधीश बिले यांनी उच्च न्यायालयाने दोषारोप निश्चित करण्यासाठी स्थगिती दिलेली नाही. त्यांनी दिलेल्या सूचनांची आॅर्डर अद्याप मला मिळालेली नाही. ती आॅनलाईन दोन दिवसांत मिळेल. आॅर्डर पाहून दि. ४ मे च्या सुनावणीमध्ये दोषारोप केहा निश्चित करायचे यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत ही सुनावणी तहकूब करू, असे सांगितले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक एस. चैतन्या, पोलिस निरीक्षक अमृत देशमुख, मेघा पानसरे, कॉ. दिलीप पवार, अ‍ॅड. चंद्रकांत बुधले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

फिरण्यास बंदी घातल्याची समीरची तक्रार
समीर गायकवाड हा कळंबा मध्यवर्ती कारागृहात अंडासेलमध्ये बंदिस्त आहे. त्याला सत्र न्यायालयाने दुपारी १२ ते ३ या वेळेत अंडासेलच्या बाहेर फिरण्यास मुभा दिली होती; परंतु कारागृह प्रशासनाने दि. २५ एप्रिलपासून त्याला बाहेर सोडण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे मी कोणाशी बोलू शकत नसल्याने वेडा होईल, मला पहिल्यासारखी मोकळीक द्यावी, अशी विनंती समीरने न्यायाधीश बिले यांच्याकडे केली. त्यांनी यासंदर्भात कारागृह प्रशासनाला सूचना केल्या जातील, असे सांगितले.

कोल्हापुरातील कळंबा कारागृहातून शुक्रवारी समीर गायकवाडला न्यायालयात घेऊन जाताना पोलिस.

Web Title: Defamation verdict after order: Govind Pansare murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.