उत्कंठावर्धक लढतीत ‘दिलबहार’ची ‘पाटाकडील’वर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 03:42 PM2020-03-11T15:42:36+5:302020-03-11T15:43:56+5:30
महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत उत्कंठावर्धक सामन्यात दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’चा टायब्रेकरवर पराभव करून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
कोल्हापूर : महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत उत्कंठावर्धक सामन्यात दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’चा टायब्रेकरवर पराभव करून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मंगळवारी या दोन पारंपरिक संघांत उपांत्यपूर्व लढत झाली. सामन्याच्या सुरुवातीला ‘पाटाकडील’कडून हृषिकेश मेथे-पाटीलने केलेली चढाई ‘दिलबहार’च्या गोलरक्षकाने परतवली. त्यानंतर ‘दिलबहार’कडून पवन माळीने दिलेल्या पासवर रोमॅरिकची गोल करण्याची संधी वाया गेली. ‘पाटाकडील’कडून ओंकार पाटील, प्रथमेश हेरेकर, रियान यादगीर यांनी सामन्यात आघाडी घेण्यासाठी अनेक चाली केल्या. मात्र, पूर्वार्धात त्यांना यश आले नाही.
उत्तरार्धात दोन्ही संघ आघाडी घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरले. त्यात ‘दिलबहार’कडून राहुल तळेकर, सणी सणगर, रोहन दाभोळकर, प्रमोद पांडे यांनी अनेक चढाया केल्या. त्या सर्व ‘पाटाकडील’च्या सजग गोलरक्षकाने परतावून लावल्या. अखेरच्या काही क्षणांत दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ करीत फुटबॉलप्रेमींकडून वाहवा मिळविली.
अखेरपर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने मुख्य पंच सुनील पोवार यांनी सामन्याचा निकाल टायब्रेकरवर घेतला. त्यात ‘दिलबहार’कडून सनी सणगर, प्रमोद पांडे, मसूद मुल्ला, अनिकेत जाधव, रोमॅरिक यांनी गोल केले; तर ‘पाटाकडील’कडून प्रथमेश हेरेकर, अक्षय मेथे-पाटील यांचेच गोल झाले. त्यामुळे हा सामना ‘दिलबहार’ने ५-२ असा जिंकत स्पर्धेची उपांत्य फेरीत गाठली.
सोमवारी (दि. ९) झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत बालगोपाल तालीम मंडळाने तुल्यबळ शिवाजी तरुण मंडळाचा टायब्रेकरवर ४-२ असा पराभव केला. या सामन्यात ‘शिवाजी’कडून २६व्या मिनिटाला संकेत साळोखेने गोलची नोंद केली होती; तर ‘बालगोपाल’कडून व उत्तरार्धात अभिनव देशमुख याने ५१व्या मिनिटास गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली.
त्यामुळे हा सामन्याचा निकाल टायब्रेकरवर घेण्यात आला. त्यात ‘बालगोपाल’कडून प्रतीक पोवार, रोहित कुरणे, आशिष कुरणे, ऋतुराज पाटील यांनी गोल केले; तर ‘शिवाजी’कडून रणवीर जाधव, ओला यांनाच गोल करता आले. त्यामुळे हा सामना बालगोपाल संघाने ४-२ असा जिंकत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
उत्कृष्ट खेळाडू - प्रमोद पांडे