सत्तारूढ आघाडीच्या पराभवाची सुरुवात एका अपमानातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:25 AM2021-05-06T04:25:50+5:302021-05-06T04:25:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीतील सत्ताधारी आघाडीच्या पराभवाची सुरुवात दोन वर्षापूर्वी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीतील सत्ताधारी आघाडीच्या पराभवाची सुरुवात दोन वर्षापूर्वी झालेल्या एका अपमानातून झाली होती. संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी संघाचे तत्कालीन अध्यक्ष विश्वास नारायण पाटील ऊर्फ आबाजी यांचा त्यांच्या जिव्हारी लागेल असा अपमान केला होता व त्या अपमानाचा बदला म्हणून त्यांनी महाडिक यांची आयुष्यात पुन्हा संगत नको, असा निर्णय घेतला होता. आबाजी सत्तारूढ आघाडीतून बाहेर पडण्यास त्या क्षणापासूनच सुरुवात झाली.
तसे आबाजी हे महाडिक यांचे अत्यंत विश्वासू संचालक, किंबहुना त्यांची सावलीच. कधीच त्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत. विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदार संघात दोन्ही निवडणुकीत ते महाडिक गटाच्या प्रचारात आघाडीवर होते. त्यातून पालकमंत्री सतेज पाटील यांचा त्यांच्यावर प्रचंड राग होता. गावातील एका प्रकरणात आबाजींना पोलिसांकडून बराच त्रास झाला. तरीही ते महाडिक यांच्याशी एकनिष्ठ राहिले. परंतु संघाच्या मुंबईतील जागेच्या व्यवहारात महाडिक व पी. एन. पाटील यांच्यात विसंवाद घडला. त्यातून महाडिक यांनी आबाजींना राजीनामा देण्याचे आदेश दिले. तेवढेच करून ते थांबले नाहीत. संघाच्या राजकारणातील अध्यक्ष असलेल्या ज्येष्ठ संचालकास त्यांनी त्यांच्या स्वाभिमानास ठेच पोहोचेल अशी वागणूक दिली. त्यानंतर आबाजींनी लगेच राजीनामा दिला. परंतु ते महाडिक यांच्यापासून दूर गेले. ते संघात महाडिक यांनी बोलविलेल्या बैठकीस जात नसत. पुढे लोकसभा निवडणुकीतही ते धनंजय महाडिक यांच्या प्रचारापासून लांब राहिले. त्यातच गत विधानसभेला महाडिक यांनी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्याबद्दलही टिपणी केली. त्यातून तेही दुखावले. या दोघांची गट्टी जमली. संघाच्या राजकारणात आनंदराव पाटील चुयेकर यांच्या निधनानंतर चुयेकर घराणे आबाजींच्या चांगले संपर्कात होते. त्यामुळे आबाजी असतील तिकडे चुयेकर घराणे राहणार, हे स्पष्टच होते. त्यामुळेच आबाजी-डोंगळे-चुयेकर ही त्रिमूर्ती एकत्र आली व तिथूनच सत्ताधारी आघाडीची पडझड सुरू झाली.
डोंगळे-आबाजी यांनी नेत्यांकडून सगळे फायदे घेऊन बाहेर पडले असल्याने त्यांच्यामागे कोण जातंय, असा एक होरा होता. परंतु तो खोटा ठरला. या तिघांनी आपल्याकडील ठरावधारक एकही हलू दिला नाहीच, शिवाय सत्तारूढ आघाडीतील मतेही कशी मिळतील अशी फिल्डिंग लावल्याने विरोधी आघाडीचा विजय सोपा बनल्याचे चित्र निकालानंतर दिसत आहे.