महापौरपदाच्या पराभवाचा वचपा काढला-जाधव यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 12:19 PM2019-10-25T12:19:02+5:302019-10-25T12:21:27+5:30
केंद्रात व राज्यात भाजप-शिवसेनेची युती असल्याने पालकमंत्री चंद्रकांत जाधव यांनी भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर जयश्री जाधव यांच्या रूपाने होईल. त्याकरिता महापौरपदासाठी जाधव यांची उमेदवारी जाहीर केली.
कोल्हापूर : महापौरपदाच्या निवडणुकीत आमदार राजेश क्षीरसागर यांच्यामुळेच आपल्या पत्नीस पराभूत व्हावे लागले होते. हा पराभव चंद्रकांत जाधव यांच्या जिव्हारी लागला. गुरुवारी जाधव यांनी उत्तर विधानसभा मतदारसंघातून आमदार क्षीरसागर यांचा पराभव करीत ‘त्या’ पराभवाचा वचपा काढल्याची चर्चा दिवसभर कार्यकर्त्यांमध्ये होती.
केंद्रात व राज्यात भाजप-शिवसेनेची युती असल्याने पालकमंत्री चंद्रकांत जाधव यांनी भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर जयश्री जाधव यांच्या रूपाने होईल. त्याकरिता महापौरपदासाठी जाधव यांची उमेदवारी जाहीर केली. त्यात शिवसेनेचे चार नगरसेवक आपल्या बाजूने मतदान करतील , अशी आशा चंद्रकांत जाधव यांना होती. मात्र, परिसरातील नगरसेविका सरिता मोरे व माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांच्याशी असलेला स्नेह यामुळे क्षीरसागर यांनी भाजपला मदत करण्याऐवजी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मोरे यांना मदत करीत महापौर केले. आपल्या पत्नीस संधी असूनही महापौर होता आले नाही. हा पराभव त्यावेळी जाधव दाम्पत्याच्या जिव्हारी लागला. ही बाब त्यांनी जवळच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेकदा बोलूनही दाखविली. सुमारे वर्षभराच्या कालावधीनंतर उत्तर विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसने चंद्रकांत यांना उमेदवारी दिली. त्यात त्यांनी क्षीरसागर यांचा पराभव केला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये ‘त्या’ पराभवाचा वचपा काढल्याची चर्चा गुरुवारी दिवसभर सुरु होती.