भाजपला हरवणे हेच पहिले टार्गेट - डी राजा
By विश्वास पाटील | Updated: February 21, 2024 16:04 IST2024-02-21T16:02:18+5:302024-02-21T16:04:12+5:30
मोदींना वाटते की लोकांचा विचार हायजॅक करता येतो

भाजपला हरवणे हेच पहिले टार्गेट - डी राजा
कोल्हापूर : भाजप देशासाठी विनाशकारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. देश आर्थिक संकटात सापडला आहे. तरीही भाजप आरएसएसच्या आदेशानुसार काम करीत आहे. त्यांची विचारधारा जात, धर्म, प्रदेशामध्ये फूट पाडणारी आहे, असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव माजी खासदार डी. राजा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले, देशात हुकूमशाही वाढते आहे. आपण आपले स्वातंत्र्य गमावत जात आहे. मोदी पुन्हा सत्तेवर येण्याचा दावा करीत आहे. मात्र, ते पराभूत होऊ शकतात. आम्ही इंडिया आघाडीसोबत आहे. जागा वाटपात आम्हालाही स्थान द्यावे, अशी मागणी केली आहे. भाजप हटाव, देश बचावसाठी आम्ही एकत्रपणे लढणार आहोत. राष्ट्रीय स्तरावर प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. आघाडीसोबत येण्यासाठी त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. भाजपला पराभूत करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट ठेवून नियोजन केले आहे.
भाजपला हुकूमशाही शासन हवे आहे. त्याला आमचा तीव्र विरोध आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे असंविज्ञानिक असल्याचे घोषित केले आहेत. यामध्ये पारदर्शकता नव्हती.
निवडणूक आयोगाच्या कामकाजावरच शंका उपस्थित केली जात आहे. ईव्हीएम यंत्रावर शंका उपस्थित केली जात आहे. सर्व मतांची व्हीव्हीपॅटवरून मतमोजणी करावी, अशी आमची मागणी आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मोदी सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. देशात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. भूकबळी वाढत आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगाराचे प्रश्न गंभीर बनले आहेत.
वन नेशन वन निवडणूक विरोधात
डी राजा म्हणाले, वन नेशन वन निवडणूक संविधान संघ राज्याच्या विरोधात आहे. ते अव्यवहार्य आहे. संसदीय व्यवस्था रद्द करणे हे भयंकर आहे.