भाजप, महाडिक कुटुंबांची ताकद विरोधी लागल्याने पराभव
By admin | Published: November 4, 2015 12:49 AM2015-11-04T00:49:17+5:302015-11-04T01:22:26+5:30
मुश्रीफ : राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार
कोल्हापूर : राज्यात भाजपची सत्ता, दुसरीकडे महाडिक कुटुंबाची ताकद, आर्थिक पाठबळ विरोधात लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नसल्याची कबुली माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार मंगळवारी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात झाला. याप्रसंगी मुश्रीफ बोलत होते.
महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे १५ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यांच्या सत्कारप्रसंगी मुश्रीफ म्हणाले, गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादीचे २५ नगरसेवक सत्तेत होते. राज्यातही सत्ता काँग्रेस-राष्ट्रवादीची होती. त्यामुळे महापालिकेसाठी अपेक्षित निधी आणण्यात यश आले. यंदाच्या निवडणुकीत प्रचारात राष्ट्रवादीने आघाडी घेतली होती. महापालिकेत सर्वांत मोठा पक्ष ठरेल, असे अपेक्षित होते; पण १५ जागा मिळाल्या, तर २१ उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. पक्षाच्या अनेक उमेदवारांचा पराभव हा अवघ्या ५० मतांनी झाला आहे. राज्यात एकीकडे भाजपची सत्ता तर दुसरीकडे आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक व आमदार अमल महाडिक यांची ताकद, आर्थिक पाठबळ हे राष्ट्रवादीच्या विरोधात उभारले होते. प्रशासकीय यंत्रणेनेही विरोधकांना साथ दिली तर दुसऱ्या बाजूला सतेज पाटील यांना विधानसभेतील पराभवाची सहानुभूती मिळाली. त्यातच प्रचारात सिंचन प्रकरण आणि केडीसीसी बँकेची चौकशी लावून राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे आम्हाला लक्ष्य गाठता आले नाही.
राष्ट्रवादीची ध्येय-धोरणे, योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवून आम्ही पुढच्या निवडणुकीसाठी सज्ज होत आहेत. निवडून आलेल्या पक्षाच्या सर्व उमेदवारांना सन्मानाने पदे दिली जातील; तर पराभूतांनी खचून न जाता पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत.
पक्ष, संघटनेत पदांबाबत त्यांचा निश्चितच विचार करू, असेही ते म्हणाले.
शहराध्यक्ष राजेंद्र लाटकर यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी स्वागत केले. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य आर. के. पोवार, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आदिल फरास यांचीही भाषणे झाली. यावेळी प्रा. जयंत पाटील व नवनिर्र्वाचित १५ नगरसेवक, पराभूत उमेदवारही उपस्थित होते. (प्रतिनिधी)