सुरक्षारक्षक पगारापासून वंचित
By admin | Published: February 13, 2016 12:28 AM2016-02-13T00:28:42+5:302016-02-13T00:31:54+5:30
ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती : नऊ महिन्यांपासून पगाराविना; उपासमारीची वेळ
गणेश शिंदे -- कोल्हापूर रोग्यसेवा ही अत्यावश्यक सेवा म्हणून आपण ओळखतो; पण या सेवेची ‘सुरक्षा’ ज्यांच्या हातात आहे, ते जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयामधील ‘रक्षक’ गेल्या नऊ महिन्यांपासून पगारापासून वंचित आहेत. पगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सुरक्षारक्षकांच्या पगारासाठी कामगार आयुक्त कार्यालयाकडे पैसे जमा केल्याचे सांगितले जाते; तर आरोग्य विभागाकडून पगारापोटी अद्याप दमडीही मिळाली नसल्याचे आयुक्त कार्यालयाकडून सांगितले जाते. या दोन्ही विभागांत समन्वयाचा अभाव असल्याचे यातून दिसून येत आहे.
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात कोल्हापूर मंडळाच्या अखत्यारीत कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश येतो. १ एप्रिल २०११ पासून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) हे आरोग्य विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. पण, ‘सीपीआर’चे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे मात्र उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांचे अधिकार देण्यात आले. ‘सीपीआर’अंतर्गत कोडोली, गांधीनगर, गडहिंग्लज व सेवा रुग्णालय (कसबा बावडा) ही चार उपजिल्हा, तर सोळांकूर, गगनबावडा, पन्हाळा, चंदगड, आदी १६ ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहेत. या रुग्णालयांत कोल्हापूर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाच्यावतीने सुरक्षारक्षकांची भरती करण्यात आली आहे. या सुरक्षारक्षकांना आरोग्य उपसंचालक, कोल्हापूर यांच्या कार्यालयामार्फत अनुदान दिले जाते. ज्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालये आहेत, त्या ठिकाणी पाचपेक्षा जास्त सुरक्षारक्षकांची नेमणूक असते. मात्र, ग्रामीण रुग्णालयात सरासरी तीन सुरक्षारक्षक सध्या कार्यरत आहे. या रुग्णालयातील बहुतांश सुरक्षारक्षकांना मे-जून २०१५पासून मासिक वेतन दिलेले नाही. त्यामुळे त्यांना चरितार्थ चालविणे मुश्कील बनले आहे. साधारणत: एका सुरक्षारक्षकाला राष्ट्रीयीकृत बँकेत साडेआठ हजार रुपयांपासून ते साडेनऊ हजारांपर्यंत पगार मिळतो. या सर्व सुरक्षारक्षकांचा महिन्याला सरासरी अडीच लाख रुपये पगार होतो. त्यांची वर्गवारी निमशासकीय प्रकारात येते.
जून ते डिसेंबर २०१५ पर्यंत ग्रामीण रुग्णालयातील सुरक्षारक्षकांचे अनुदान देण्यात आले आहे. फक्त जानेवारी २०१६ चे अनुदान देण्यात आलेले नाही.
-डॉ. आर. बी. मुगडे,
आरोग्य उपसंचालक, कोल्हापूर मंडळ.
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून अनुदान न मिळाल्याने ग्रामीण रुग्णालयांतील सुरक्षारक्षकांचे पगार भागविता आलेले नाहीत. - सुहास रा. कदम, सहायक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ
सुरक्षारक्षकांनी यापूर्वी कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी काम केले आहे. त्यावेळी त्यांचा पगार सुमारे तीन हजार रुपयांच्या घरात जात होता. दरम्यान, मध्यंतरी सुरक्षारक्षकांनी एकत्र येऊन सार्वजनिक आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे पगार वेळेत मिळावा याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर हा प्रश्न काही प्रमाणात सुटला; पण पगार मिळत नसल्यामुळे सुरक्षारक्षकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.