पदवीचे विद्यार्थी 'एमपीएससी'च्या अंतिम परीक्षेला मुकणार, शिवाजी विद्यापीठातील निकाल लवकर जाहीर करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 12:23 PM2023-01-28T12:23:33+5:302023-01-28T12:24:10+5:30
४५ दिवसांत निकाल लावण्याचे बंधन असले तरी लवकर निकाल लावल्यास या विद्यार्थ्यांना 'एमपीएससी'ची संधी मिळू शकते.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या सहाव्या सेमिस्टरच्या परीक्षा आणि त्यांचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ('एमपीएससी') अंतिम परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांची संधी हुकण्याचीच शक्यता अधिक आहे. अर्थात आयोगाच्या परीक्षा आणि शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांच्या वेळापत्रकाचे समन्वय साधण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
'एमपीएससी' परीक्षांचा साधारणत: अभ्यासाचे नियोजन करताना विद्यार्थी मुख्य परीक्षांचा अभ्यासक्रम महत्त्वाचा मानतात. दरवर्षी साधरणत: फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यामध्ये पूर्वपरीक्षा होते आणि मुख्य परीक्षा जुलै ते सप्टेंबर या कालावधीत घेतली जाते.
यंदा गट ब आणि क सेवा संयुक्त परीक्षा ३० एप्रिलला होत आहे आणि त्यांचा अंदाजित निकाल जूनमध्ये लागण्याची शक्यता आहे. याशिवाय यंदा प्रथमच सुमारे आठ हजार जागांसाठी 'एमपीएससी''मार्फत भरती होत आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाचे शेवटच्या वर्षाचे सुमारे ऐेंशी ते नव्वद टक्के विद्यार्थी 'एमपीएससी'' परीक्षेची तयारी करत आहेत.
विद्यापीठाच्या परीक्षांच्या नियोजनानुसार या विद्यार्थ्यांच्या पाचव्या सेमिस्टरच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. अजून सहाव्या आणि अंतिम सेमिस्टरच्या परीक्षांचे वेळापत्रक मे महिन्यात आणि त्यांचा निकाल उशिरा म्हणजेच जूनमध्ये लागण्याची शक्यता आहे. शिवाय त्यांचे ९० दिवसांचे त्यांचे शैक्षणिक वर्ष या कालावधीत ते पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी पूर्वपरीक्षेला बसू शकतात. मात्र अंतिम परीक्षेला बसण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पदवी परीक्षेचे प्रमाणपत्र ते 'एमपीएससी'ला सादर करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांची संधी हुकण्याची शक्यता आहे.
लवकर निकाल लावण्याची मागणी
शिवाजी विद्यापीठांच्या परीक्षांचा निकाल लागला की लगेच मुख्य परीक्षांचे अर्ज निघत असत आणि तोपर्यंत म्हणजे जून महिन्याच्या शेवटी पदवीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागत असे; पण कोरोनानंतर हे वेळापत्रक विस्कळित झाले आहे. ४५ दिवसांत निकाल लावण्याचे बंधन असले तरी लवकर निकाल लावल्यास या विद्यार्थ्यांना 'एमपीएससी'ची संधी मिळू शकते. त्यामुळे विद्यापीठाने 'एमपीएससी'च्या अंतिम परीक्षेपूर्वी सहाव्या सेमिस्टरची परीक्षा घेऊन त्यांचे निकालही तत्काळ लावावेत, अशी मागणी होत आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या पदवीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा पूर्वीप्रमाणे वेळेत पूर्ण करून त्यांचे निकाल 'एमपीएससी'च्या अंतिम परीक्षेपूर्वी लावावेत, म्हणजे लोकसेवा आयोगाच्या या परीक्षा देणे या विद्यार्थ्यांना शक्य होईल. - गणेश पानारी, - सांगरूळ, ता. करवीर
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तारखा निश्चित नसल्याने त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा व त्याचा निकाल लावणे शक्य नसते. विद्यापीठाच्या परीक्षांचे नियोजन खूप आधीपासून केलेले असते. - डॉ. अजितसिंह जाधव - संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ - शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर