कोल्हापुरातील सीपीआरमध्ये डिस्चार्जला विलंब; पालकमंत्र्यांच्या कारवाईच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 11:49 IST2025-02-01T11:48:50+5:302025-02-01T11:49:40+5:30
जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची विचारपूस

कोल्हापुरातील सीपीआरमध्ये डिस्चार्जला विलंब; पालकमंत्र्यांच्या कारवाईच्या सूचना
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील सावरवाडी येथील दोन वर्षांच्या बाळाला डिस्चार्ज देतो म्हणून दिवसभर थांबवून ठेवल्याच्या प्रकाराबद्दल पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांन तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांवर कारवाईच्या सूचना दिल्या. कारवाईचा अहवाल माझ्याकडे पाठवा, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.
आरोग्यमंत्री असलेल्या आबिटकर यांनी शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सीपीआरला भेट दिली. यावेळी त्यांनी जीबी सिंड्रोम आजाराने दाखल झालेल्या दोन मुलांच्या तब्येतीची चौकशी केली. याचवेळी सावरवाडी येथील एका दाम्पत्याने आपल्या मुलाला डिस्चार्ज देतो म्हणून सांगून दिवसभर दिला नसल्याचे आबिटकर यांना सांगितले. आता रात्री ९ वाजता आम्ही कसे घेऊन जाऊ अशी विचारणा केली. यावेळी आबिटकर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे यांना संबंधितांवर कारवाईच्या सूचना केल्या. असले प्रकार अजिबात घडता कामा नये असेही ते म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना आबिटकर म्हणाले, मुळात हा नवा आजार नसून जुनाच आहे. तसेच संसर्गजन्य नाही. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. त्यावर चांगले उपचार आहेत. त्या पध्दतीने राज्यभर उपचार सुरू आहेत. त्यामुळे जनतेने घाबरू नये. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, डॉ. गिरीश कांबळे, डाॅ. बुद्धिराज पाटील, डॉ. अपराजित वालावलकर, बंटी सावंत यांच्यासह डाक्टर उपस्थित हाेते.
किती व्हेंटिलेटर हवेत? रविवारी नियोजन बैठकीत निर्णय घेऊ
हा थोरला दवाखाना आहे. या ठिकाणी उत्तम सुविधा हव्यातच. सर्वसामान्यांसाठी असलेला हा दवाखाना आहे. त्यामुळे तुम्हाला किती व्हेंटिलेटर पाहिजेत ते सांगा. रविवारी नियोजन मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेऊ, असे आबिटकर यांनी यावेळी स्पष्ट केले.