आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबणीवर; पालक हवालदिल
By संदीप आडनाईक | Published: June 14, 2024 02:04 PM2024-06-14T14:04:10+5:302024-06-14T14:05:10+5:30
याप्रकरणी आणखी काही याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत
कोल्हापूर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या प्रवेशाची यादी १३ जून रोजी प्रसिद्ध होणार होती. मात्र,या प्रकरणी आणखी काही याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत, परंतु, त्यावर सुनावणी झाली नाही. त्यामुळे आता १८ जून रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार असून यानंतर ऑनलाईन लॉटरीद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाण्याची शक्यता आहे. शाळा सुरु होण्याच्या तोंडावर ही प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडल्यामुळे सर्व पालक हवालदिल झाले आहेत.
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी शासनाने केवळ शासकीय, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्राधान्याने लॉटरी काढली. मात्र, काही शाळांनी आरटीईच्या राखीव जागांवर इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यामुळे काही शाळा न्यायालयात गेल्या. न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली. परिणामी शासनाला गतवर्षाप्रमाणे केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया नव्याने राबवावी लागली.
मराठी शाळांसंदर्भात दि. १२ आणि १३ जून रोजी न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतु, ती झाली नाही. आता पुढील सुनावणी १८ जून रोजी आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी न्यायालयाच्या सुनावणीनंतरच प्रवेशाचा निर्णय घेतला जाणार आहे,असे सूत्रांनी सांगितले आहे. आरटीई प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडे राज्यातील ९ हजार २१७ शाळांमधील १ लाख ५ हजार ३९९ जागांसाठी २ लाख ४२ हजार ९७२ अर्ज ऑनलाईन पध्दतीने आले आहेत.