राजीनामा दिरंगाईमुळे सहा कोटींच्या कामांना ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:17 AM2021-06-11T04:17:13+5:302021-06-11T04:17:13+5:30
कोल्हापूर : बांधकाम विभागाची कामे थांबवण्याचे पत्र बुधवारी दिल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी गुरुवारी दुसरा लेटर बॉम्ब ...
कोल्हापूर : बांधकाम विभागाची कामे थांबवण्याचे पत्र बुधवारी दिल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी गुरुवारी दुसरा लेटर बॉम्ब टाकला आहे. बांधकाम आणि शिक्षण विभागाच्या मंजूर कामांना प्रशासकीय मान्यता देऊ नये आणि कोणत्याही बिलाचे पैसे अदा करू नयेत, असे पत्र त्यांनी गुरुवारी दिले. त्यामुळे सहा कोटींच्या कामांना ब्रेक लागला आहे. बांधकाम सभापती हंबीरराव पाटील यांची कोंडी करण्यासाठीच पुन्हा हे दुसरे पत्र देण्यात आले आहे.
शिक्षण सभापती प्रवीण यादव आणि स्वाती सासने यांनी आपापल्या नेत्यांकडे राजीनामे दिले आहेत. परंतु, माजी आमदार सत्यजित पाटील यांचे समर्थक असलेले हंबीरराव पाटील यांनी राजीनामा दिलेला नाही. अखेर पाटील सहजासहजी राजीनामा देत नसल्याने त्यांची कोंडी करण्यासाठी अध्यक्ष बजरंग पाटील यांच्याकडूनच तजवीज करण्यात आली. त्यानुसार पाटील यांनी हंबीरराव पाटील यांनी मंजूर केलेली कामे थांबवण्याचे लेखी पत्रच बुधवारी कार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांना दिले. तरीही याबाबत गुरुवारी दुपारपर्यंत राजीनाम्याबाबत हालचाली न झाल्याने कारभारी मंडळींनी दुसरा लेटर बॉम्ब टाकण्यासाठी अध्यक्षांना सांगितले.
त्यानुसार अध्यक्ष पाटील यांनी दुसरे पत्र वित्त विभागाचे प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांना गुरुवारी दुपारी दिले. यामध्ये बांधकाम आणि शिक्षण विभागाच्या कोणत्याही कामांना प्रशासकीय मान्यता देऊ नये, तसेच या विभागाच्या कोणत्याही बिलाचे पैसे अदा करू नयेत, असे पत्र दिले आहे. त्यामुळे राजीनामा प्रकरण अधिकच तापले आहे.
चौकट
रस्ते, गटारी, शाळा दुरुस्ती थांबणार
बांधकाम विभागाची ३ कोटी ६३ लाख रुपयांची कामे नियोजित करण्यात आली असून, त्यापैकी १ कोटी १० लाखांची कामे सध्या वित्त विभागाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी आहेत. शाळांच्या दुरुस्तीची २ कोटी २७ लाखांची कामे असून, त्यापैकी ९० लाखांची कामे सध्या वित्त विभागाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी प्रतीक्षेेत आहेत. जोपर्यंत नवीन पदाधिकारी निवड होणार नाही तोपर्यंत ही कामे थांबणार असून, पावसाळ्यामुळे आता ऑक्टोबरमध्येच ही कामे करावी लागणार आहेत.
चौकट
नेत्यांनी सांगितले की, माझा राजीनामा स्वाती सासने यांनी नेत्यांकडे दिला आहे.. प्रवीण यादव यांनीही आपला राजीनामा माजी आमदार डॉ. सुजीत मिणचेकर यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे हंबीरराव पाटील यांनी लवकर राजीनामा द्यावा, यासाठी त्यांच्यावर दबाव आहे. दुपारी अमर पाटील, शशिकांत खोत, प्रा. अर्जुन आबिटकर, सेनापती कापशीचे शशिकांत खोत यांनी हंबीरराव पाटील यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. ‘माझ्या राजीनाम्याचा निर्णय नेत्यांनी घ्यायचा आहे. त्यांनी सूचना करताच मला राजीनामा देण्यास अडचण नाही’ असे त्यांनी स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले.
चौकट
आज स्थायी समितीची सभा
शुक्रवारी दुपारी १ वाजता स्थायी समितीची सभा आहे. या राजीनामा प्रकरणाचे पडसाद स्थायी समितीतही उमटण्याची शक्यता आहे. पदाधिकारी बदलाच्या पार्श्वभूमीवर फारसे महत्त्वाचे विषय या सभेत मांडण्याबाबत साशंकता आहे.