स्थगित असणारी ‘कोल्हापूर-मुंबई’ विमानसेवा २८ डिसेंबरपासून पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:13 PM2019-12-21T12:13:26+5:302019-12-21T12:16:22+5:30
तांत्रिक कारणामुळे तात्पुरती स्थगित असलेली ‘कोल्हापूर-मुंबई’ विमानसेवा दि. २८ डिसेंबरपासून पूर्ववत सुरू होणार आहे. ट्रू जेट कंपनीकडून पूर्वीच्या वेळेनुसार ही विमानसेवा पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी दिली.
कोल्हापूर : तांत्रिक कारणामुळे तात्पुरती स्थगित असलेली ‘कोल्हापूर-मुंबई’ विमानसेवा दि. २८ डिसेंबरपासून पूर्ववत सुरू होणार आहे. ट्रू जेट कंपनीकडून पूर्वीच्या वेळेनुसार ही विमानसेवा पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी दिली.
या मार्गावरील विमानसेवा स्थगित असल्याने कोल्हापूरमधील उद्योग, व्यवसाय, पर्यटन, आदी क्षेत्रांची मोठी गैरसोय झाली होती. ती दूर करण्यासाठी संबंधित विमानसेवा पूर्ववत सुरू व्हावी; यासाठी दिल्ली येथे सरकार आणि संबंधित कंपनीच्या पातळीवर पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले असून, ‘कोल्हापूर-मुंबई’ विमानसेवा शनिवार (दि. २८)पासून सुरू केली जाणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे, असे खासदार मंडलिक यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबई विमानतळावरील धावपट्टीचे काम सुरू असून, त्यामुळे वेळापत्रकाचे पुनर्नियोजन करावे लागणार असल्याने, ट्रू जेट कंपनीने मुंबई-कोल्हापूर विमानसेवा शनिवार (दि. ७) ते शुक्रवार (दि. २७) पर्यंत तात्पुरती स्थगित केली होती. तसेच कंपनीने ही सेवा शनिवार (दि. २८) पासून सुरू करणार असल्याचे त्यावेळी जाहीर केले होते; मात्र, गेल्या आठवड्यात या कंपनीच्या संकेतस्थळावर आॅनलाईन तिकीट नोंदणी उपलब्ध दिसत नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमावस्था असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारच्या (दि. १८) अंकात प्रसिद्ध केले होते.
त्यावर या कंपनीने सेवा पूर्ववत सुरू होणार असल्याचे कोल्हापूर विमानतळाच्या संचालकांना कळविले आहे. या कंपनीच्या संकेतस्थळावर शनिवार (दि. २८) पासूनची तिकीट नोंदणी उपलब्ध दिसत असल्याचे पर्यटनतज्ज्ञ बी. व्ही. वराडे यांनी सांगितले.
‘मुंबई-कोल्हापूर’ विमानसेवा शनिवार (दि. २८)पासून पुन्हा सुरू करण्यात येईल, असे ट्रू जेट कंपनीचे कोल्हापुरातील व्यवस्थापक बी. रणजितकुमार यांनी शुक्रवारी कळविले आहे. पूर्वीप्रमाणे मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार अशी आठवड्यातील पाच दिवस सेवा पुरविण्यात येणार आहे.
- कमलकुमार कटारिया,
संचालक, विमानतळ
विमानसेवेची वेळ
- मुंबईतून निघणार : दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी
- कोल्हापूरमध्ये येणार : १ वाजून ५० मिनिटांनी
- कोल्हापुरातून निघणार : २ वाजून १० मिनिटांनी
- मुंबईत पोहोचणार : ३ वाजून २० मिनिटांनी