चेंबर्सच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:20 AM2021-07-17T04:20:56+5:302021-07-17T04:20:56+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू होण्यापूर्वी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू होण्यापूर्वी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हिटिचा दर कमी झाल्याचे पटवून सांगत शहरातील सर्व दुकाने सोमवारपासून सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली.
आमदार चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळात चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष शिवाजी पोवार, माजी अध्यक्ष आनंद माने, मानद सचिव धनंजय दुग्गे, संचालक प्रशांत शिंदे, अजित कोठारी, राहुल नष्टे, संपत पाटील यांचा समावेश होता.
आमदार जाधव व संजय शेटे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटिचा दर कमी होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना पटवून दिले. तसेच गेल्या शंभर दिवसांपासून शहरातील व्यवसाय बंद असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, यापुढे व्यवसाय बंद ठेवणे परवडणारे नाही, याकडेही त्यांचे लक्ष वेधले. रात्री साडेआठच्यासुमारास शहरातील सर्वच दुकाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्याचे शेटे यांनी सांगितले.