पोलंडच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांसह शिष्टमंडळ आज कोल्हापुरात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 02:10 AM2019-09-13T02:10:54+5:302019-09-13T06:45:52+5:30
दरम्यान, खासदार संभाजीराजे यांनी या पोलंडवासीयांची कोल्हापूरशी असणारी ओढ पाहून त्यांच्याशी बंध आणखी दृढ करावेत यासाठी प्रयत्न सुरू केले
कोल्हापूर : पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री मार्सिन प्रीझीदॅज यांच्या नेतृत्वाखालील २९ जणांचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ शुक्रवारी १३ रोजी कोल्हापुरात येत आहे. त्यांच्या हस्ते वळिवडे येथील पोलंड निर्वासितांच्या स्मृतिस्तंभाचे उद्घाटन होणार आहे. यानिमित्ताने कोल्हापूर आणि पोलंडवासीयांच्या भावुक नात्यांचे बंध अधिक दृढ होणार आहेत. विशेष म्हणजे २९ जणांच्या शिष्टमंडळात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या वसाहतीत बालपण घालविलेल्या ११ जणांचा समावेश आहे. यानिमित्ताने हे वृद्ध पोलंडवासीय आपल्या जन्मभूमीत पुन्हा एकदा पाऊल ठेवणार आहेत.
दुसºया महायुद्धकाळात १९४२ ते १९४८ या काळात पोलंडचे पाच हजार नागरिक निर्वासित म्हणून कोल्हापुरात आले. त्यांना तत्कालीन छत्रपती घराण्याने आसरा देत वळिवडे येथे वसाहत उभारून दिली. या ऋणातून मुक्त होण्यासाठी यांतील काही पोलंडवासीय न चुकता कोल्हापुरात येत होते.
दरम्यान, खासदार संभाजीराजे यांनी या पोलंडवासीयांची कोल्हापूरशी असणारी ओढ पाहून त्यांच्याशी बंध आणखी दृढ करावेत यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्याच प्रयत्नांतून पोलंडवासीयांच्या स्मृती जपण्याचा उपक्रम हाती घेतला. वळिवडे येथे स्मृतिस्तंभासह
त्या वसाहतीतील छायाचित्रांसह कायमस्वरूपी संग्रहालय उभारण्यास सुरुवात झाली.
आज स्मृतिस्तंभ तयार झाला आहे. त्याचे उद्घाटनही या पोलंडवासीयांच्याच हस्ते करण्याचा निर्णय घेऊन तसे निमंत्रण त्यांना दिले गेले. त्यांनी निमंत्रणाचा स्वीकार केला. त्याप्रमाणे हे शिष्टमंडळ कोल्हापुरात येत आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार बैठकीत सांगितले. उपपरराष्ट्रमंत्री मार्सिन प्रीझीदॅज यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ शुक्रवारी रात्री कोल्हापुरात येणार आहे. शनिवारी (दि. १४) सकाळी आठ वाजता हॉटेल सयाजी येथे उद्योजकांशी ते संवाद साधणार आहेत.
फौंड्री, अॅन्सिलरी मशीन कॉम्पोनंट्स, आॅटो पार्टस, हाय प्रिसिशन टूल्स, साखर, गूळ, यार्न स्पिनिंग मिल आणि टेक्स्टाईल, रासायनिक आणि डेअरी उद्योगातील प्रतिनिधींना यावेळी बोलावण्यात आले आहे. पत्रकार बैठक होणार आहे. यानंतर सकाळी १०.३० वाजता प्रीझीदॅज यांच्या हस्ते वळिवडे येथील स्मृतिस्तंभाचे अनावरण होणार आहे.