चळवळीच्या बेरजेत नेत्यांची वजावट

By admin | Published: June 4, 2017 11:33 PM2017-06-04T23:33:59+5:302017-06-04T23:33:59+5:30

चळवळीच्या बेरजेत नेत्यांची वजावट

Delegation of Leaderless Opposition Leaders | चळवळीच्या बेरजेत नेत्यांची वजावट

चळवळीच्या बेरजेत नेत्यांची वजावट

Next


अशोक पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, जयसिंगपूर येथील ऊस दराच्या आंदोलनाचा वणवा राज्यभर पेटवून शेतकरी चळवळीच्या केंद्रस्थानी आलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना व अन्य संघटनांच्या पुलाखालून गेल्या काही वर्षात बरेच पाणी वाहून गेले. आता अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी नेतृत्वविरहीत आंदोलनाने महाराष्ट्रभर आंदोलनाचा वणवा पेटविला आणि चळवळीच्या बेरजेत संघटनांच्या नेत्यांची वजाबाकी झाली.
राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीने संघर्ष यात्रेचा रोड शो केला. हा शो फ्लॉप करण्यासाठी भाजप सरकारने म्हणजेच स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जलशिवार योजनेंतर्गत मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर नेले.
काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपच्या या भूमिकांमुळे शेतकऱ्यांचा कसलाही फायदा झालेला नाही. खासदार राजू शेट्टी यांनी काढलेल्या आत्मक्लेश यात्रेनंतरही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळेच पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी संपाची हाक दिली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटला.
या संपामध्ये तडजोड करण्यासाठी काही नेत्यांनी शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. तोही या शेतकऱ्यांनी हाणून पाडला. तरीसुध्दा औरंगाबाद येथील संत्री-मोसंबी आंदोलनातील नेते जयाजी सूर्यवंशी आणि कऱ्हाड येथील संदीप गिड्डे यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मध्यस्थीने हा संप मागे घेतला होता; परंतु हे शेतकऱ्यांना मान्य नसल्याने शेतकरी पुन्हा आक्रमक झाला आहे. त्यांनी सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
एकंदरीत कर्जमुक्ती, ऊस, कांदा, धान, तूरडाळ या पिकांना हमीभाव मिळावा यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह शेतकरी संघटनांनी आपआपल्या परीने आंदोलन केले आहे. परंतु हे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे शेतकरी स्वत:च या चळवळीत उतरला आहे.
संदीप गिड्डे मूळचे तासगावचे
मूळचे तासगाव तालुक्यातील असणारे संदीप गिड्डे गेल्या १० वर्षांपासून कऱ्हाडवासी झाले आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने भरणाऱ्या कृषी प्रदर्शनानिमित्ताने त्यांनी इव्हेंट कंपनी स्थापन केली. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चामध्ये ते अग्रेसर होते. बैठका यशस्वी करण्यासाठी ते मार्गदर्शनही करत होते. कोल्हापूर येथील मराठा क्रांती मोर्चातून त्यांना बाजूला केले होते. इस्लामपूर येथे भरविण्यात आलेला आंबा महोत्सव आणि प्रदर्शनानिमित्त गिड्डे मंत्री सदाभाऊ खोत यांच्या संपर्कात आले. आता मुंबई येथील बैठकीत घुसून शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केल्याचे बाहेर आले आहे.

यापूर्वी विविध शेतकरी संघटनेतील नेत्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात करून स्वत:चा स्वार्थ साधला आहे. त्यामुळेच ऊस पट्ट्यातील शेतकरी या नेत्यांवर नाराज आहे. त्यातच शेतकरी संघटनेला कार्यकर्त्यांची वानवा आहे. त्यामुळेच दक्षिण महाराष्ट्रात या संपाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. मात्र नव्यानेच स्थापन झालेल्या बळीराजा संघटनेच्यावतीने मी स्वत: एकटा गावोगावी जाऊन संपात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करत आहे. यासाठी सर्वाच्या सहकार्याची गरज आहे.
- बी. जी. पाटील, अध्यक्ष, बळीराजा संघटना
सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादकांची संख्या मोठी आहे. पालेभाज्या, फळे पिकवण्यात नाशिक, नगर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याठिकाणी असलेले शेतकरी मोठ्या प्रमाणात संपात सहभागी आहेत. आंदोलन तीव्र करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात स्वत: तळ ठोकून आहे. गनिमीकाव्याने आंदोलन सुरू असून, महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. याला चांगला प्रतिसाद मिळेल.
- रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना

Web Title: Delegation of Leaderless Opposition Leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.