आजीबाईचा बटवा अन् कोरोनाला हटवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:28 AM2021-05-25T04:28:35+5:302021-05-25T04:28:35+5:30
कोल्हापूर : पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेल्या आजीबाईंच्या बटव्यामध्ये कोरोनासारख्या जैविक शस्त्रापासून लढण्याचीदेखील ताकद आहे. गेल्यावर्षी सुरू झालेल्या या संकटावर मात ...
कोल्हापूर : पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेल्या आजीबाईंच्या बटव्यामध्ये कोरोनासारख्या जैविक शस्त्रापासून लढण्याचीदेखील ताकद आहे. गेल्यावर्षी सुरू झालेल्या या संकटावर मात करण्यासाठी, या आजारापासून दूर राहण्यासाठी हळद, दूध, गरमपाणी आल्याचा रस, मिठाच्या गुळण्या, मसाल्यांचा वापर करून केलेले काढे, आयुर्वेदिक काढे यांचा घराघरांत वापर केला जात आहे.
गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचे संकट सुरू झाले आणि त्यापासून वाचण्यासाठीच्या वेगवेगळ्या उपाययोजनांवर विचारमंथन सुरू झाले. ही महामारी आधुनिक असली तरी त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांसाठी भारतीय संस्कृतीची जीवनशैली असलेली आयुर्वेद आणि पारंपरिक उपचार पद्धतीच कामाला आली. यामुळे जगभरात पुन्हा एकदा आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित झाले. अन्य देशांच्या तुलनेत भारतीयांमध्ये या रोगाशी लढण्याची प्रतिकारशक्ती अधिक दिसून आली याचे कारण म्हणजे घराघरांत वापरले जाणारे मसाले. प्रत्येक स्वयंपाकघरात अगदी रोज वापरल्या जाणाऱ्या या मसाल्यांनी व जेवणात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे कोरोनाविरोधातील लढाईत मोलाचे योगदान आहे. वेगवेगळ्या आजारांवर केल्या जाणाऱ्या घरगुती उपायांचा खजिना असतो तो आजीबाईच्या बटव्यात. कुटुंबातील वयोवृद्ध आजीकडून सुना, लेकी, नातींपर्यंत सगळ्यांकडे हा बटवा असतोच. आता कोरोना काळातही या आजीबाईच्या या बटव्याने कुटुंबाचे सुरक्षाकवच म्हणूनच जबाबदारी पेलली आहे.
--
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण - ९९ हजार १९८
कोरोनामुक्त झालेले रुग्ण - ८२ हजार २८३
सध्या उपचार घेत असलेले रूग्ण : १३ हजार ५२१
कोरोनामृत्यू : ३ हजार ३९१
--
आजीबाईच्या बटव्यात काय
गेल्यावर्षी कोरोना सुरू झाला तेव्हापासून मी रोज तुळस, हळद, आलं, लवंग, दालचिनी आणि गूळ घालून केलेला काढा पिते. घराच्या कुंडीत गवतीचहा लावला आहे. रोज चहात आलं आणि गवती चहा घालून पिते. जेवणात हळद आणि आल्याचा वापर वाढविला आहे.
सुमन कमते (राजारामपुरी)
-
आमच्या घरातील चारजण पॉझिटिव्ह आले. मी आणि लहान नातींना कोरोना होऊ नये म्हणून रोज गरम पाण्यात हळद आणि आल्याचा रस घालून पित होतो. रात्री झोपताना गरम दूध, हळद, गुळवेलचे चाटण करून खात होतो. रोज न चुकता वाफ आणि डॉक्टरांनी सांगितलेले आयुर्वेदिक काढे घेतले. य घरगुती उपायांमुळे आम्ही कोरोनाला दूर ठेवू शकलो.
अनुराधा काशीद (देवकर पाणंद)
--
माझं वय ८५. काही महिन्यांपूर्वी मला कोरोना झाला. एकीकडे डॉक्टरांचे उपचार सुरू होते, दुसरीकडे आम्ही घरगुती उपायदेखील सुरू ठेवले. मी रोज ताजं ताक, हिरव्या भाज्यांचे सूप पित होते. हळद दूध, आयुर्वेदिक काढे पित होते. भाज्या आणि फळांमुळे ताकद वाढली. कोरोनातून बरे झाल्यानंतरदेखील मी हा आहार कायम ठेवला आहे, त्यामुळे आता मी पूर्णत: तंदुरुस्त आहे.
उमा परुळेकर
---
कशाचा काय फायदा
मिठाच्या पाण्याच्या गुळण्या : रोग प्रतिबंधक उपाय. मीठ हे जंतुनाशक असल्याने गरम पाणी आणि मिठाच्या गुळण्या केल्याने घश्यातील जंतू मरतात. घश्याला आराम मिळतो.
हळद : हळदीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे शरीरात जंतुरोधक म्हणून काम करते. त्यामुळे काढ्यात, गरम पाण्यात किंवा दुधात हळद घालून त्याचे सेवन केले जाते.
अद्रकचा रस : आल्याचा रसदेखील जंतुरोधक म्हणून काम करते. सर्दी, खोकला, घश्यात खवखव असेल तर पूर्वीपासून आपल्याकडे आल्याच्या रसात मध घालून पितात. वरील त्रासापासून आराम मिळतो, रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
--
आपल्याकडे ऋतुमानातील बदलानुसार आहार केला जातो. जेवणात वापर केल्या जाणाऱ्या मसाल्यांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या मसाल्यांसह वनौषधींपासून बनविले जाणारे काढे कोरोनापासून बचाव करतात. आयुर्वेद आणि भारतीय जीवनशैलीचे महत्त्व यानिमित्ताने जगाला समजले आहे.
डॉ. सुनील पाटील (आयुर्वेदाचार्य)
--