‘आयआरबी’च्या केबिन्स हटवा :
By Admin | Published: January 1, 2016 12:31 AM2016-01-01T00:31:02+5:302016-01-01T00:32:56+5:30
महापौरांची आयुक्तांकडे मागणी
कोल्हापूर : शहरातील टोल रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असला तरी टोलवसुलीसाठी ‘आयआरबी’मार्फत उभारलेल्या केबिन्स, बॅरिकेट्स ह्या वाहनधारकांना अडथळा ठरत आहेत. त्यामुळे हे अडथळे काढून टाकण्यात यावेत, अशी मागणी महापौर अश्विनी रामाणे यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.
कोल्हापूर शहरात एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प अंतर्गत आयआरबी कंपनीने शहरातील रस्तेविकासाचे काम केलेले आहे. या कंपनीच्या कामाचा दर्जा तसेच नियोजनाप्रमाणे काम होत नसल्याने शहरात असंतोष निर्माण होऊन शहरवासीयांनी गेली पाच वर्षे आंदोलने केली. शहरवासीयांच्या आंदोलनांची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल रद्दची घोषणा केली.
कोल्हापूर शहर हे ऐतिहासिक असले तरी मुख्य व्यापारी पेठेचे केंद्र आहे. दक्षिण काशी व श्री अंबाबाईचे वास्तव्य, दख्खनचा राजा श्री जोतिबा, नृसिंहवाडी ही देवस्थाने तसेच येथे ऐतिहासिक असा पन्हाळा किल्ला आहे. त्यामुळे शहरात भाविक व पर्यटकांची गर्दी असते. सिंधुदुर्ग व रत्नागिरी या कोकणातील दोन जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा आहे.
त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील वाहतूक ही शहरातूनच होते. ‘आयआरबी’ कंपनीमार्फत टोलवसुलीसाठी उभारलेल्या केबिन्स, बॅरिकेटस्मुळे वाहनधारकांना वाहन चालविताना अडचणी होत आहेत. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. वाहतूक सुरळीत, सुरक्षित व गतीने होण्यासाठी आयआरबी कंपनीने शहरात प्रवेश करणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर टोलवसुुलीसाठी उभ्या केलेल्या केबिन्स, बॅरिकेट्स काढणे आवश्यक आहे. त्याबद्दल तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महापौर अश्विनी रामाणे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
टोल रद्द करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी अद्याप अधिसूचना न निघाल्याने शहरवासीयांत संदिग्धता आहे. आयआरबी कंपनी न्यायालयात जाण्याची शक्यता असल्याची भीती कोल्हापूर शहरवासीयांच्या मनात जागा करीत आहे. त्यामुळे आयआरबी कंपनीने उभारलेल्या केबिन्स हटविणे महत्त्वाचे आहे.
- अश्विनी रामाणे, महापौर