कळंबा टोल नाका हटवा : आयुक्त
By admin | Published: October 27, 2014 12:14 AM2014-10-27T00:14:16+5:302014-10-27T00:15:40+5:30
टोल समिती, ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना यश
कोल्हापूर / कळंबा : कळंबा टोलनाका हा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याने तो तेथून हटवावा व महापालिकेच्या हद्दीमध्ये स्थलांतरित करावा, असा आदेश आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी काल (शनिवार) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) दिले. आज, रविवारी या आदेशाचे पत्र महामंडळाला दिले. या आदेशाची प्रत दुपारी टोलविरोधी कृती समितीचे बाबा पार्टे, नगरसेवक मधुकर रामाणे यांनी टोलनाक्यावरील बंदोबस्तासाठी असलेले करवीर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांना दिली. तत्पूर्वी, सकाळी टोलवसुली सुरू झाल्याचे समजताच सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या काही कार्यकर्त्यांनी या नाक्यावरील लोखंडी बॅरेकेटस हटवून संताप व्यक्त केला.
कंपनीने सायंकाळी हा टोलनाका हटविण्यासाठी साहित्य आणले होते, पण, रात्री उशिरापर्यंत टोल नाका हटविण्यात आला नव्हता. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी, कळंबा साई मंदिर येथे टोलनाक्यासाठी पाहणी केली. पण हा टोलनाका उभा करण्यास स्थानिक नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे या टोलनाक्याच्या प्रश्नावरून वातावरण तापले आहे. दरम्यान, शाहू टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्याकडे आयआरबी कंपनीच्या ओळखपत्राची विचारणा करत कर्मचारी व पोलिसांना टोल समितीच्या कार्यकर्त्यांनी धारेवर धरले.यावेळी वातावरण तणावपूर्ण बनून काही काळ टोलवसुली बंद राहिली.
कळंबा येथे आयआरबी कंपनीने कळंबे तर्फ ठाणे या ग्रामपंचायतीच्या हद्दीत टोलनाका उभा केला आहे. मात्र, या टोलनाक्याची परवानगी घेतली नसून तो महापालिकेच्या हद्दीत स्थलांतरित करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. यावरून काल (शनिवार) टोल समितीचे निमंत्रक निवास साळोखे व प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच विश्वास गुरव, समितीतील कार्यकर्ते, सदस्य यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीमध्ये एन. डी. पाटील यांनी उद्या, सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आयआरबीने परवानगी घ्यावी व टोलवसुली बंद करावी अन्यथा, टोलनाका उखडू, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना फोनद्वारे दिला होता.
आज, रविवारी सकाळी कळंबा टोलनाक्यावर वसुली सुरू झाली. हा प्रकार टोल समितीच्या कार्यकर्त्यांना समजले. त्यानुसार बाबा पार्टे, अजित सासने, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, रमेश मोरे आले.
समितीचे कार्यकर्ते येताच पाहून नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी वसुली बंद करून तेथून धूम ठोकली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी लोखंडी बॅरेकेटस तेथून हटवून शेजारील मोकळ्या जागेत टाकल्या. यावेळी बाबा पार्टे यांनी, आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांचे एमएसआरडीसीला पत्र तेथील बंदोबस्तासाठी असलेले पोलीस अधिकाऱ्यांना दिले.त्यानंतर दुपारी टोल समितीचे कार्यकर्ते शाहू टोलनाक्याकडे रवाना झाले. त्यांनी तेथील टोलनाक्याकडे आयआरबीच्या ओळखपत्राविषयी विचारणा केली. त्यावेळी कर्मचाऱ्यांकडे देसाई गु्रपची ओळखपत्रे असल्याचे निदर्शनास आले. यावेळी दिलीप देसाई व बाबा पार्टे यांनी, टोलनाक्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना हा प्रकार सांगितला.
त्यावेळी तेथे बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कॉन्स्टेबल इकबाल महात यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी हा प्रकार वरिष्ठ पोलीसांना सांगा, असे म्हटल्यावर कृती समितीतील कार्यकर्त्यांचा पारा चढला. त्यावरून पोलीस व कार्यकर्त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर सर्वजण राजारामपुरी पोलीस ठाण्यास गेले. त्याठिकाणी पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांच्या कानावर हा प्रकार घातला. दिलीप देसाई यांनी, या टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना ‘देसाई ग्रुप’ची ओळखपत्रे आहेत. त्यांना आयआरबीची अधिकृत ओळखपत्रे हवी. त्यांना आमचा आक्षेप नाही, असे सांगितले. त्यावर देशमुख यांनी, याबाबत आयआरबीकडून प्राथमिक माहिती घेतो, असे उत्तर दिले.
साई मंदिराजवळील जागेबाबत स्थानिक नगरसेवकांचा विरोध
शाहू टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना आयआरबीच्या ओळखपत्राची विचारणा
काही काळ टोल वसुली बंद