‘वेतन आयोग अधिसूचना’ त्रुटीमुक्त करा, अन्यथा राज्यभर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:23 AM2020-12-29T04:23:51+5:302020-12-29T04:23:51+5:30
शिवाजी विद्यापीठ सेवक संघाच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेतर सेवक संयुक्त कृती समितीच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक ...
शिवाजी विद्यापीठ सेवक संघाच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेतर सेवक संयुक्त कृती समितीच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक झाली. समितीचे सर्व संघटक हे अध्यक्षस्थानी होते. राज्यातील अकृषी विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन वर्षांनी सातवा वेतन आयोग लागू केला; पण तो लागू करताना कर्मचाऱ्यांना ५८ महिन्यांची थकबाकी नाकारली. सहाव्या वेतन आयोगात लागू केलेल्या सुधारित वेतनश्रेण्या पुन्हा कमी केल्या. त्यापोटी ११ वर्षांमधील वसुली करण्याचे जुलमी आदेश दिले आहेत. हा आदेश वेतन सुधारणारा नव्हे, तर कर्मचाऱ्यांचे आर्थिक खच्चीकरण करून त्यांना खाईत लोटणारा आहे, अशा संतप्त भावना या बैठकीत व्यक्त झाल्या.
कृती समितीचे मुख्य संघटक अजय देशमुख, रावसाहेब त्रिभुवन, दिनेश दखणे, आनंद खामकर, समन्वयक रमेश डोंगरशिंदे, प्रकाश म्हसे, संदीप हिवरकर, डॉ. कैलास पाथ्रीकर, केतन कान्हेरे, सुरेश लाड यांनी मनोगत व्यक्त केले. सातव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी देण्यासंदर्भात न्यायालयात बाधित कर्मचाऱ्यांच्या वतीने महासंघातर्फे याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी लागू असलेले शासन निर्णय रद्द करून कर्मचाऱ्यांकडून वसुलीचा घातलेला घाट हाणून पाडण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी चंद्रमणी सहारे, चंद्रशेखर शेळके, अनिल धरमारी, रविकांत हुक्केरी, मिलिंद धोत्रे, प्रवीण पाटील, मिलिंद भोसले, अतुल ऐतावडेकर, अनिल साळोखे, सुनील जाधव, राम तुपे, आदी उपस्थित होते.
समितीच्या काही मागण्या
५८ महिन्यांची थकबाकी मिळावी.
वेतनश्रेणी ७ ऑक्टोबर २००९ आणि आकृतिबंधाच्या मंजूर शासन निर्णयानुसारच पूर्ववत व्हाव्यात.
सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेचे १२ व २४ वर्षांच्या दोन लाभांच्या योजना पूर्ववत सुरू कराव्यात.
चौकट
वित्तमंत्र्यांसमवेत बैठक
दरम्यान, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची कृती समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. त्यावर वित्त मंत्र्यांसमवेत कृती समितीची बैठक लावण्यात येईल, असे आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले.
फोटो (२७१२२०२०-कोल-शिक्षकेत्तर कर्मचारी बैठक) : शिवाजी विद्यापीठात रविवारी राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेतर सेवक संयुक्त कृती समितीच्या बैठकीत रमेश डोंगरशिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेजारी बाबा सावंत, रावसाहेब त्रिभुवन, मिलिंद भोसले, हितेंद्र साळुंखे, आदी उपस्थित होते.