पुजाऱ्यांना पंधरा दिवसांत हटवा
By admin | Published: June 22, 2017 01:20 AM2017-06-22T01:20:42+5:302017-06-22T01:20:42+5:30
संघर्ष समितीची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन; मोठ्या प्रमाणात आंदोलकांची उपस्थिती
कोल्हापूर : श्री पंढरपूर, शिर्डी, तुळजापूर मंदिरांप्रमाणे अंबाबाई मंदिरातील तथाकथित हक्कदार पुजाऱ्यांना १५ दिवसांत मंदिर प्रवेश बंदी करण्यात यावी व त्याजागी पुजाऱ्यांची ‘पगारी नोकर’ म्हणून नियुक्ती करण्यात यावी, या मागणीचे निवेदन बुधवारी श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार यांना देण्यात आले.
अंबाबाई भक्तांच्यावतीने सुरू असलेल्या ‘पुजारी हटाओ’ आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून बुधवारी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. आंदोलकांची संख्या मोठी असल्याने ताराराणी सभागृहात मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार, निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे, माजी आमदार सुरेश साळोखे उपस्थित होते.
यावेळी विजय देवणे म्हणाले, पुजाऱ्यांचे गैरवर्तन आणि त्यांनी शाहू महाराजांचा केलेला अपमान शाहूनगरीला मान्य नाही. न्यायालयात जाऊन प्रशासनाच्या आणि मंदिराच्या कामात आडकाठी करायची, ही श्रीपूजकांची पद्धत आहे. प्रशासनानेही ‘पुजारी हटाओ’साठी प्रयत्न केले पाहिजेत.
दिलीप देसाई म्हणाले, देवीला सळ्या, पट्ट्या, एमसील लावले जाते, कानसने घासून चुरा काढला जातो. सन १९९७ मध्ये सोन्याचे नेत्र गुजरीत विकले गेले. त्या गुन्ह्याबद्दल पुजाऱ्याला तीन वर्षांची शिक्षा झाली. देणग्यांमध्ये अपहार झाले. पुजारी देवीचे सोन्याचे पाय मुंबई, पुण्याला नेतात आणि भक्तांकडून लाखो रुपये लुटून आणतात. छत्रपतींच्या वटहुुकुमाला तथाकथित म्हणतात. शंकराचार्यांचे ग्रंथ मानत नाहीत आणि या सगळ्यांवर ‘देवस्थान’चे निर्बंध नसल्याने त्यांचे फावले आहे. वसंतराव मुळीक म्हणाले, नागचिन्ह, सिंह फोडून अंबाबाईचे लक्ष्मीकरण केले जात आहे. शिवपत्नी असताना विष्णूपत्नी करण्याचा डाव केला जात आहे. याविरोधात देवस्थान व शिवाजी विद्यापीठाने पुढाकार घेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणावी. जयश्री चव्हाण यांनी महिलांना देवीच्या पूजेचा अधिकार मिळावा, अशी मागणी केली. सुभाष देसाई यांनी निवेदनाचे वाचन केले. यावेळी देवस्थानचे सदस्य शिवाजी जाधव, संगीता खाडे, शरद तांबट, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, नगरसेवक जयंत पाटील, शारंगधर देशमुख, राहुल माने, लाला भोसले, राहुल चव्हाण, नगरसेविका वहिदा सौदागर, दीपा मगदूम, माधुरी लाड, माधवी गवंडी, स्वाती यवलुजे, नीलोफर आजरेकर, माजी नगरसेवक राजू लाटकर, बाबा पाटे, अॅड. चारूलता चव्हाण यांच्यासह भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दबावाखाली काम
करता काय?
यावेळी माजी महापौर आर. के. पोवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना गेले बारा दिवस आंदोलन सुरू आहे तरी तुम्ही याबाबत तातडीने बैठक घेऊन हा विषय का सोडवला नाही, तुम्ही पालकमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत आहात का, अशी विचारणा केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पुजाऱ्यांना नोटीस काढण्यात आली आहे. मी कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही, असे सांगितले.
‘पुजारी हटाव’ देवस्थानचा ठराव
आनंद माने म्हणाले, अंबाबाईच्या गाभाऱ्यात जाण्याचा हक्क केवळ पुजाऱ्यांचा आहे अन्य कोणालाही सोडण्यात येऊ नये, या पुजाऱ्यांच्या याचिकेला निशिकांत मेथे, मी वादी झालो आणि त्याची सुनावणी आता सुरू झाली आहे. प्रधानांचा मंदिरावरील हक्क संपुष्टात आला त्याचवेळी मुनिश्वरांसह पुजाऱ्यांचा हक्कही बरखास्त व्हायला हवा होता. जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या काळात देवस्थान समितीचा पुजाऱ्यांना ‘सरकारी नोकर’ मानण्याचा ठराव झाला होता त्यावर अंमलबजावणी व्हावी.
निवेदनातील प्रमुख मागण्या अशा :
अंबाबाईची काठापदराची साडी ही वेशभूषा कायम ठेवावी, नवरात्रामध्येही त्यात बदल करता कामा नये.
‘श्री अंबाबाई मंदिर’ असा उल्लेख शासन दरबारी कागदपत्रात, जाहीर निवेदनात, बोर्डवर करावा, तसेच रेल्वेला ‘श्री अंबाबाई एक्स्प्रेस’ असे नाव दिले जावे.
व्यसनी, शासकीय कर चुकविणारे, गुन्हे दाखल असलेल्या पुजाऱ्यांना त्वरित मंदिर प्रवेशावर बंदी घालावी व चारित्र्यसंपन्न व निर्व्यसनी अशा पुजाऱ्यांची ‘पगारी नोकर’ म्हणून नियुक्ती करावी.
विद्यमान पुजाऱ्यांनी आपण हक्कदार कसे ठरलो याचे पुरावे जनतेपुढे जाहीर करावेत.
मंदिरात देवीला येणारे दागिने, साड्या, रोख रक्कम खजिन्यात जमा व्हावी. सध्या देवस्थानच्या पेटीत, हुंडीत रोख रक्कम दागिने अर्पण करू न देणाऱ्या पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा.
मूर्ती संवर्धनाची सीडी जाहीर करावी.
गाभाऱ्यात शासनातर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
ही स्त्री देवता असल्याने स्त्रियांनीच स्नान, वस्त्रालंकार यांसारखे विधी करावेत.
देवीच्या नावावर मिळविलेल्या करोडो रुपयांचा हिशेब विद्यमान पुजाऱ्यांनी द्यावा. त्याचा विनियोग समाजकार्य, तीर्थक्षेत्र आराखडा विकासासाठी व्हावा.