बेळगाव महापालिकेसमोरील लाल-पिवळा ध्वज हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:26 AM2021-03-09T04:26:58+5:302021-03-09T04:26:58+5:30

बेळगाव : बेळगाव महापालिकेसमोरील तिरंगा ध्वजाचा अवमान करणारा बेकायदेशीर लाल-पिवळा ध्वज हटवावा, या मागणीसाठी सोमवारी सकाळी मध्यवर्ती महाराष्ट्र ...

Delete the red-yellow flag in front of Belgaum Municipal Corporation | बेळगाव महापालिकेसमोरील लाल-पिवळा ध्वज हटवा

बेळगाव महापालिकेसमोरील लाल-पिवळा ध्वज हटवा

Next

बेळगाव : बेळगाव महापालिकेसमोरील तिरंगा ध्वजाचा अवमान करणारा बेकायदेशीर लाल-पिवळा ध्वज हटवावा, या मागणीसाठी सोमवारी सकाळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला.

बेळगाव महापालिकेसमोर कन्नड संघटनांच्या म्होरक्यांनी बेकायदेशीर लाल-पिवळा ध्वज उभारला आहे. तो ध्वज हटवण्याची मागणी सातत्याने करूनही प्रशासनाकडून तो ध्वज हटविण्यास टाळाटाळ केली जात आहे. याच्या निषेधार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला. शहरातील ध. संभाजी चौक येथून या मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चाच्या अग्रभागी समितीचे नेते आणि समितीचा बॅनर व भगवे ध्वज घेतलेल्या म. ए. समिती महिला आघाडीच्या कार्यकर्त्या होत्या. लाल-पिवळ्या ध्वजाच्या आणि प्रशासन व सरकारच्याविरोधात घोषणा देत निघालेल्या या मोर्चात शहर परिसर तसेच तालुक्यातील हजारो कार्यकर्ते आणि मराठी भाषिक सहभागी झाले होते.

‘नहीं चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी’, ‘बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहात नाही’, ‘भगव्या झेंड्याचा विजय असो, महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो’, ‘तिरंग्यासमोर लाल-पिवळा ध्वज फडकवणाऱ्या देशद्रोही संघटनांचा धिक्कार असो’, ‘हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी’ आदी घोषणांनी मोर्चेकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. मोर्चाच्या दुतर्फा मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

धर्मवीर संभाजी चौकातून निघालेला हा विराट मोर्चा यंदे खुट, कॉलेज रोडमार्गे चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार होता. तथापि मोर्चाच्या विराट स्वरूपाची जिल्हाधिकाऱ्यांना माहिती मिळताच, त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सरदार हायस्कूल मैदानावरच मोर्चेकऱ्यांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ स्वतःहून सरदार हायस्कूल मैदानावर हजर झाले आणि त्यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे दीपक दळवी आणि अन्य नेत्यांनी सादर केलेले निवेदन स्वीकारले. एप्रिलपूर्वी आपण कन्नड संघटनांच्या नेतेमंडळींशी चर्चा करून लाल-पिवळ्या ध्वजासंदर्भात निश्चितपणे अंतिम निर्णय घेऊ, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी दीपक दळवी, प्रकाश मरगाळे, शुभम शेळके, माजी आमदार मनोहर किणेकर, नेताजी जाधव, निंगोजी हुद्दार, राजाभाऊ पाटील, एल. आय. पाटील, संतोष मंडलिक, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माधुरी हेगडे, श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी, सुनील जाधव ,राजू पावले, रवी निर्मळकर आदी नेतेमंडळी मोर्चाच्या अग्रभागी होती.

चौकट : जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी प्रारंभी कन्नडमध्ये बोलण्यास सुरुवात केली, त्यावेळी कार्यकर्त्यांनी आक्षेप घेऊन त्यांना मराठीत बोला, असे सांगितले. मात्र, आपल्याला मराठी येत नसल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी हिंदीमध्ये संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन कार्यकर्त्यांना मान्य नव्हते. लाल-पिवळ्या ध्वजासंदर्भात तात्काळ निर्णय द्यावा, अशी त्यांची मागणी होती. परंतु दीपक दळवी यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. तसेच जोपर्यंत महापालिकेसमोरील लाल-पिवळा ध्वज हटविला जाणार नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांसमोर त्यांनी स्पष्ट केले.

रस्ते अडविले तरीही कार्यकर्ते पोहोचलेच : मराठी भाषिकांचा आजचा हा महामोर्चा असफल करण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. परगावचे कार्यकर्ते मोर्चाच्या स्थळापर्यंत पोहोचू नयेत, यासाठी बऱ्याच ठिकाणी रस्ते अडविण्यात आले होते. तथापि पोलिसांचा विरोध झुगारून कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांचे जथ्थेच्या जथ्थे मोर्चामध्ये येऊन सहभागी झाले होते. मोर्चाची सरदार हायस्कूल मैदानावर सांगता झाली. या ठिकाणी समिती नेते आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन छेडले. त्यावेळी मैदानासभोवताली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

फोटो: ०८ बेळगाव मोर्चा : मनपासमोरोल अनधिकृत लाल-पिवळा ध्वज हटवा, या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले मराठी भाषिक.

Web Title: Delete the red-yellow flag in front of Belgaum Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.