मालिकेतील मनोहर भोसलेचा फोटो हटविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:51 AM2021-09-02T04:51:58+5:302021-09-02T04:51:58+5:30
वाघापूर : बाळूमामांच्या नावाने माया जमविणारा भोंदूबाबा मनोहर भोसले याने भाविकांची आर्थिक लूट करून फसवणूक केली आहे. आदमापूर तसेच ...
वाघापूर : बाळूमामांच्या नावाने माया जमविणारा भोंदूबाबा मनोहर भोसले याने भाविकांची आर्थिक लूट करून फसवणूक केली आहे. आदमापूर तसेच परिसर गावातील लोक उंदरगाव येथे अमावास्या तसेच दर रविवारी खेटे घालण्यासाठी गाड्याच्या गाड्या घेऊन जात होते. काही राजकीय लोकही सतत त्याच्या संपर्कात होते. याकडे काणाडोळा केला जात होता; परंतु आदमापूर ग्रामपंचायतीच्या ठरावामुळे ही गोष्ट उजेडात आली. ग्रामीण भागातील कष्टकरी, भोळ्याभाबड्या लोकांची होणारी फसवणूक यामुळे थांबली आहे. तसेच आदमापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या, भक्तांच्या मागणीनुसार एका खासगी मराठी वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या ‘बाळूमामांच्या नावानं चांगभलं’ या मालिकेच्या प्रारंभी मनोहर भोसले याचा दाखविला जाणारा फोटोही त्वरित हटवा, अन्यथा तीव्र आंदोलन उभे करू, प्रसंगी मालिका बंद पाडू असा इशारा दिला होता. या मागणीपत्राची दखल मालिकेचे निर्माते संतोष आयाचित यांनी घेतली असून, तो फोटो हटविण्यात आला आहे. ग्रामपंचायत, ग्रामस्थ व भाविकांच्या या लढ्याला यश आले आहे. ग्रामपंचायत आदमापूर व ग्रामस्थांच्या भूमिकेमुळेच मनोहर भोसले याचा भंडाफोड ‘लोकमत’ने सलग दोन दिवस सडेतोड बातम्या देऊन केली. त्याची दखल घेऊन कोल्हापूर व सोलापूर जिल्हा आवृत्ती, सर्व लोकमत परिवाराचे सरपंच विजयराव गुरव यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानून अभिनंदन केले आहे.
कोटेशन:
‘सर्व प्रकारच्या भोंदूगिरीतून समाज मुक्त झाला पाहिजे. धर्माची विधायक चिकित्सा केली पाहिजे, समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे तसेच बुद्धिप्रामाण्यवादाचा अंगीकार केला पाहिजे, अशी अंनिसची भूमिका आहे.’
डॉ. अरुण शिंदे