जिल्हा प्रशासनाच्या वेबसाइटवरील मजकूर हटवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:25 AM2021-03-23T04:25:32+5:302021-03-23T04:25:32+5:30
कोल्हापूर देवी अंबाबाई आणि भवानी मंडपबाबत चुकीची असलेली माहिती कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने वेबसाइटवरून हटवली आहे. ...
कोल्हापूर देवी अंबाबाई आणि भवानी मंडपबाबत चुकीची असलेली माहिती कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने वेबसाइटवरून हटवली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी ही माहिती दिली.
अशा पद्धतीने जिल्हा प्रशासनाच्या वेबसाइटवर पर्यटन या मथळ्याखाली अंबाबाई, भवानी मंडपबाबत आक्षेपार्ह माहिती देण्यात आल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले. यानंतर खासदार संभाजीराजे यांनीही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना पत्र लिहिले. त्यानंतर हा मजकूर हटविण्यात येणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले होते.
त्यानुसार तातडीने हा मजकूर हटवण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, श्री महालक्ष्मी भक्त मंडळ धर्मशाळा यांच्या वतीने राजू मेवेकरी यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. वेबसाइटवर दिलेल्या माहितीच्या खाली संपर्क म्हणून येथील महालक्ष्मी भक्त मंडळाचे नाव आणि संपर्क नंबर टाकण्यात आला होता. याबद्दल मेवेकरी यांनी पत्र लिहिले आहे. आमच्या संस्थेला कोणतीही माहिती न देता अशा पद्धतीने संस्थेचे वापरलेले नाव आणि नंबर काढून टाकावा अशी विनंती पत्रातून करण्यात आली आहे. या सर्व मजकुराशी संस्थेचा काहीही संबंध नसल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.