राधानगरी तालुक्यातील पर्यटनस्थळे आनंद देणारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:26 AM2021-09-27T04:26:47+5:302021-09-27T04:26:47+5:30
कोल्हापूर : राधानगरी तालुका हा विविध जैवसंपत्तीने नटलेला तालुका आहे. निसर्गाची देणगी लाभलेल्या या तालुक्यातील पर्यटनस्थळे आनंद देणारी असून ...
कोल्हापूर : राधानगरी तालुका हा विविध जैवसंपत्तीने नटलेला तालुका आहे. निसर्गाची देणगी लाभलेल्या या तालुक्यातील पर्यटनस्थळे आनंद देणारी असून त्याचा आनंद पर्यटकांनी लुटावा, असे आवाहन तहसीलदार श्रीमती निंबाळकर यांनी केले.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत पर्यटन सप्ताह साजरा केला जात असून यानिमित्ताने राधानगरी तालुक्यात पर्यटकांसाठी आयोजित केलेल्या पदभ्रमंती उपक्रमाचा प्रारंभ रविवारी करण्यात आला. त्यावेळी तहसीलदार श्रीमती निंबाळकर बोलत होत्या. कार्यक्रमास गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजित तायशेटे वनक्षेत्रपाल अजित माळी, राधानगरीच्या सरपंच कविता शेट्टी, बायसन नेचर क्लबचे सम्राट केरकर, दीपक शेट्टी, रुपेश बोंबाडे, किरण पारकर, अतुल बोंबडे, रविकिरण सुतार व पर्यटक उपस्थित होते.
राधानगरी तालुक्यात राधानगरी धरण, दूधगंगा धरण, तुळशी धरण, राऊतवाडी धबधबा, कासारवाडी धबधबा, दाजीपूर अभयारण्य यासह अनेक पर्यटनाची ठिकाणे आहेत. या पर्यटनस्थळांना भेटी देऊन पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटावा, असे आवाहन तहसीलदारांनी केले.
कार्यक्रमानंतर उपस्थित पर्यटकांसाठी कासारवाडी धबधबा व जंगल पदभ्रमंतीचे आयोजन करण्यात आले. पदभ्रमंतीमध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पर्यटकांनी सहभाग घेतला.
निसर्गाच्या सान्निध्यात आल्यावर माणसाच्या मनावरील ताण हलका होतो, यासाठी जैवविविधतेने नटलेल्या राधानगरी तालुक्यात पर्यटकांनी यावे, असे आवाहन वनक्षेत्रपाल श्री. माळी यांनी केले.