महिलेची उघड्यावरच प्रसुती
By admin | Published: December 3, 2015 01:08 AM2015-12-03T01:08:04+5:302015-12-03T01:15:27+5:30
भवानी मंडपातील घटना : बाळ-बाळंतीण सुखरुप; भंगारवाल्या महिलेने केली मदत
कोल्हापूर : अवघडलेल्या अवस्थेतच पतीने घराबाहेर काढले...त्यामुळे मोठ्या आशेने माहेरच्या आधाराला आल्यावर तिथेही वाट्याला आलेले आटलेले प्रेम...अशा स्थितीत एका गरोदर महिलेने महिनाभर भवानी मंडप परिसरात आश्रय घेतला... उघड्यावरच अवघडलेल्या स्थितीत पोटातील अंकुर जगावा यासाठी तिची धडपड सुरू होती... अचानक मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास अर्चना सुरेश आडी (वय ३१) या महिलेची भवानी मंडपामध्ये उघड्यावरच प्रसुती होऊन तिला मुलगी झाली. त्यावेळी तिच्या मदतीला भंगार गोळा करणारी महिला सुमन धावून आली. परंतु सकाळपर्यंत महिला व नवजात बालक उघड्यावरच होते. त्याकडे कोणाची नजरही गेली नव्हती. अखेर त्यांना दुपारी बाराच्या सुमारास ‘सीपीआर’ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले.
घडले ते असे.. अर्चना आडी यांचे पाच वर्षांपूर्वी संकेश्वरातील सुरेश आडी यांच्याशी लग्न झाले. त्यांचे माहेर व्यंकटेशनगर, शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील आहे. त्या आठ महिन्यांच्या गरोदर असताना पतीने त्यांना महिन्याभरापूर्वी घराबाहेर काढले. त्यानंतर त्या शिरोली पुलाची येथे माहेरी भावाकडे आल्या, परंतु या ठिकाणी जेमतेम दहा ते बारा दिवस राहिल्या. त्या ठिकाणीही त्यांना येथे राहू नकोस असे सांगण्यात आले. त्या भटकत-भटकत भवानी मंडपात आल्या. गेल्या सतरा दिवसांपासून त्या या परिसरात जागा मिळेल तिथे राहत होत्या. गरोदर असल्याने त्यांनी आपल्या प्रकृतीविषयी ‘सीपीआर’ रुग्णालयात दाखविले होते. परंतु त्यांची रुग्णालयातील फाईलच काही दिवसांपूर्वी चोरीला गेली आहे.
मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पोटात कळा येऊन त्यांची प्रसुती झाली. यावेळी झालेल्या आवाजाने तिथे शेजारी असलेल्या भंगार गोळा करणाऱ्या सुमन नावाच्या महिलेने तिकडे धाव घेत त्यांना माणुसकीचा धीर दिला. सकाळपर्यंत महिला व बाळ हे उघड्यावरच होते. सकाळी दहाच्या सुमारास काही लोकांना हा प्रकार समजला त्यांनी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला; परंतु त्यांनी अरेरावीची भाषा वापरत येण्यास स्पष्ट नकार दिल्याचे सांगण्यात आले. साडेबाराच्या सुमारास नागरिकांनी ‘सीपीआर’ प्रशासनाशी संपर्क साधल्यावर काही वेळातच रुग्णवाहिका या ठिकाणी दाखल झाली. यानंतर रुग्णवाहिकेमधून महिलेला व तिच्या बाळाला सीपीआरमध्ये नेण्यात आले. त्या महिलेची प्रकृती चांगली असल्याचे सीपीआर मधील सुत्रांनी सांगितले. परंतु त्या महिलेला का बाहेर काढले? याबाबत उपस्थितांमधून चर्चा सुरू होती.
डॉ. दिलीप पाटील यांच्या निलंबनाची मागणी
भवानी मंडप येथे तुळजाभवानी मंदिरानजीक गर्भवती महिलेची उघड्यावर प्रसुती होत असताना स्थानिक नागरिकांनी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांना फोन करूनसुद्धा जाणून-बुजून दुर्लक्ष केल्याचा प्रकार हा गंभीर असून त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्यावतीने शहर अध्यक्ष सुरेश पोवार यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना दिले आहे.
‘ती’ महिला मामाच्या आश्रयाला
अर्चना आडे या महिलेला प्रसूतीनंतर सीपीआर रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तिच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. त्यावेळी तिचा मामा बाळू कोकाटे (रा. पुष्पनगर, गारगोटी) यांनी तिची ‘सीपीआर’मध्ये भेट घेतली. त्यानंतर तिला आपल्या घरी नेत असल्याचे त्यांनी ‘सीपीआर’चे डॉक्टर व पोलिसांना सांगितले. (प्रतिनिधी)