मागणी १६ हजारांची, आले २४००
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:24 AM2021-04-25T04:24:26+5:302021-04-25T04:24:26+5:30
कोल्हापूर : कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी गेल्या दहा दिवसांत १६ हजार रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी नियंत्रण कक्षाकडे झाली; त्यांपैकी केवळ दोन हजार ...
कोल्हापूर : कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी गेल्या दहा दिवसांत १६ हजार रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी नियंत्रण कक्षाकडे झाली; त्यांपैकी केवळ दोन हजार ४०० इंजेक्शनचा पुरवठा कोल्हापूरसाठी झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात या इंजेक्शनचा तुटवडा आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, आता रोजच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या हजारावर पोहोचली आहे. गंभीर रुग्णांवर रेमडेसिविर इंजेक्शनद्वारे उपचार केले जात आहेत. या इंजेक्शनचा काळाबाजार रोखून पुरवठा नियंत्रित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्षात १३ तारखेपासून नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले. गेल्या १० दिवसांत या कक्षाकडे तब्बल १६ हजारांवर रेमडेसिविरची मागणी हॉस्पिटल्सनी नोंदवली आहे. मात्र या इंजेक्शनचा तुटवडाच एवढा आहे की, केवळ दोन हजार ४०० इंजेक्शनचा पुरवठा झाला आहे.
नियंत्रण कक्षात हॉस्पिटलच्या प्रतिनिधींबरोबर रुग्णांचे नातेवाईक हेलपाटे मारत आहेत; पण इंजेक्शन केवळ हॉस्पिटलनाच पुरवण्यात येत असून त्यांच्याकडून ते रुग्णांना दिले जात आहे. चार-पाच दिवस पाठपुरावा केल्यानंतर मागणीच्या ५० टक्के इंजेक्शन एका हॉस्पिटलला मिळत आहे.
--
आत्ताच ही स्थिती; पुढे काय..?
कोरोनाचा कहर सुरू होऊन दहा-पंधरा दिवस झाले तर ही स्थिती आहे. मे महिन्यात तर परिस्थिती बिकट असेल असेच एकूण वातावरण आहे. या आणीबाणीच्या काळात गंभीर, अतिगंभीर किंवा खरंच गरज असलेल्या रुग्णांसाठी रेमडेसिविरची मागणी केली जावी अशी अपेक्षा आहे. मात्र सरसकट मागणीमुळेही कृत्रिम टंचाई होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
--
गतवर्षी पाससाठी, यंदा इंजेक्शनसाठी फोन
गेल्या वर्षीच्या तुलनेत रेमडेसिविरसाठी खूप लवकर मागणी सुरू झाली आहे. जिल्हाबंदीमुळे गेल्या वर्षी सर्वाधिक फोन व दबाव ई-पास मिळविण्यासाठी टाकला जात होता. आता त्याची जागा रेमेडेसिविरने घेतली आहे. या इंजेक्शनसाठी नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांकडे लोकप्रतिनिधींपासून ते अधिकारी, ओळखीच्या लोकांचे फोन येत आहेत.
---