बिबट्याच्या मृत्यूस जबाबदार घटकांवर कारवाईची मागणी
By admin | Published: January 2, 2015 11:48 PM2015-01-02T23:48:21+5:302015-01-02T23:48:21+5:30
या बाबींवर व्हावी चौकशी...
कोल्हापूर : रुईकर कॉलनीत घुसलेल्या बिबट्याला काल, गुरुवारी चुकीच्या पद्धतीने पकडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. त्यासाठी जबाबदार असलेल्या वन आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी प्रजासत्ताक संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्याबाबतचा ई-मेल त्यांना पाठविला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई व सचिव बुरहान नाईकवडी यांनी पत्रकाद्वारे दिली.
पत्रकात म्हटले आहे की, वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी व्यवस्थापन तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यांचा अंमल होणे आवश्यक आहे. मात्र, रुईकर कॉलनीत काल चार तास पाठलाग आणि चुकीच्या पद्धतीने पकडल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाला. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे.
या बाबींवर व्हावी चौकशी...
घटनास्थळी कोणते अधिकारी हजर होते? जे हजर नव्हते ते का याठिकाणी आले नाहीत? मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर, करवीर रेंजचे वनसंरक्षक निंबाळकर यांची भूमिका काय? बिबट्या व्यवस्थापनासाठीची तत्त्वे पाळली का? नसल्यास कोण जबाबदार? बिबट्याला जेरबंद करायचे आदेश कोणी दिले? त्यासाठी परवानगी घेतली का? जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कोठे होते? त्यांनी काय प्रयत्न केले? गर्दी हटविण्यास पोलीस का अपयशी ठरले? बिबट्याला पकडल्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार का करण्यात आले नाहीत? त्याला तसेच का नेण्यात आले? बिबट्याच्या शवविच्छेदनात त्याच्या शरीरावरील जखमांची नोंद केली आहे का? त्याचे चित्रीकरण केले आहे का?