मराठा दाखल्यांसाठी ‘महा-ई-सेवा केंद्र’चालकांकडून लूट: शिवसेनेची कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 04:28 PM2019-02-05T16:28:26+5:302019-02-05T16:30:44+5:30
मराठा दाखल्यांसाठी महा-ई-सेवा केंद्र चालकांकडून ४०० ते ५०० रुपये घेऊन समाजबांधवांची लूट केली जात आहे. त्यांची तपासणी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. याची गांभीर्याने दखल न घेतल्यास शिवसेना मूक मोर्चाऐवजी ठोक मोर्चा काढेल, असा इशाराही देण्यात आला.
कोल्हापूर : मराठा दाखल्यांसाठी महा-ई-सेवा केंद्र चालकांकडून ४०० ते ५०० रुपये घेऊन समाजबांधवांची लूट केली जात आहे. त्यांची तपासणी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. याची गांभीर्याने दखल न घेतल्यास शिवसेना मूक मोर्चाऐवजी ठोक मोर्चा काढेल, असा इशाराही देण्यात आला.
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दुपारी जिल्हाधिकारी सुभेदार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.
संजय पवार म्हणाले, मराठा दाखला मिळविण्यासाठी समाजबांधवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महा ई सेवा केंद्र चालकांकडून दाखले देण्यासाठी जाणीवपूर्वक वेळ केला जात आहे. जेणेकरून दाखला लवकर पाहिजे असल्यास जादा पैसे घेऊन लोकांची लूट करता येऊ शकेल. केंद्र चालकांकडून तब्बल ४०० ते ५०० रुपये आकारले जात आहेत. याबाबत आपल्याकडे असंख्य तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी.
ते पुढे म्हणाले, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे उद्योगासाठी बिनव्याजी कर्जासाठी राष्ट्रीयकृत बॅँकातील अमराठी अधिकाऱ्यांकडून मराठा समाजबांधवांना हीन वागणूक दिली जात आहे. उलट कर्ज बुडव्यांना व टक्केवारी देणाऱ्यांना बॅँकेकडून पायघड्या घातल्या जात आहेत, हे चुकीचे आहे.
यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने जादा पैसे आकारणाऱ्या केंद्र चालकांची नावे असल्यास आपल्याकडे द्यावीत असे सांगितले. तसेच लवकरच ई सेवा केंद्र चालकांची बैठक घेऊन त्यांना दाखल्यांसाठी योग्य रक्कम आकारण्यासंदर्भात सूचना केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख शिवाजी पाटील, माजी जिल्हाप्रमुख रवी चौगुले, राजू यादव, शशी बीडकर, रणजित आयरेकर, अवधूत साळोखे, आप्पा पुणेकर, दत्ताजी टिपुगडे, शुभांगी पोवार, मेघना पेडणेकर, कमल पाटील, राजू जाधव, सुनील पोवार, नरेश तुळशीकर, दिलीप जाधव, अशोक पाटील, प्रवीण पालव, आदी उपस्थित होते.