महिला फौजदाराकडून लाचेची मागणी

By admin | Published: July 17, 2016 12:55 AM2016-07-17T00:55:13+5:302016-07-17T01:01:37+5:30

शाहूवाडी उपअधीक्षक कार्यालयातील प्रकार : कारवाईची चाहूल लागताच कामावर गैरहजर

Demand for bribe from women's army | महिला फौजदाराकडून लाचेची मागणी

महिला फौजदाराकडून लाचेची मागणी

Next

कोल्हापूर : पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या सावकाराविरोधात फिर्याद देण्यास गेलेल्या तक्रारदाराकडेच शाहूवाडी पोलिस उपविभागीय कार्यालयातील महिला पोलिस उपनिरीक्षकाने एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्याची चाहूल लागताच ही महिला अधिकारी चार दिवस कार्यालयाकडे फिरकलीच नाही. या घटनेनंतर या कार्यालयाकडून जाणीवपूर्वक तक्रारदाराला त्रास दिला जात आहे; तर सावकार पोलिस अधिकाऱ्यांना हाताशी धरून तोडपाणी करीत तक्रारदाराच्या जिवाशी खेळत आहे. अखेर न्याय्य हक्कासाठी झगडणाऱ्या भोई कुटुंबाने पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांचा दरवाजा ठोठावला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की विजय शंकर भोई (रा. गुडाळवाडी, ता. राधानगरी) यांनी व्यवसायासाठी खासगी सावकार नामदेव रामचंद्र पाटील (रा. वेतवडे, ता. पन्हाळा) यांच्याकडून दि. १२ नोव्हेंबर २०१४ रोजी चार लाख रुपये वीस टक्के व्याजाने घेतले. त्याबदली त्यांनी कोरा स्टॅम्प, तीन कोरे कागद, तीन ठिकाणी सह्या करून घेतले. त्यानंतर भोई यांनी ३ मे २०१४ रोजी ४ लाख ८० हजार रुपये पाटील यांना परत केले. त्यानंतर तो आणखी पाच लाख रुपयांची मागणी करू लागला. पैसे नसल्याने भोई यांनी त्याला नकार दिला. व्यवसायात अडचणी निर्माण झाल्याने भोई यांनी मंगळवार पेठेतील घर विक्रीसाठी काढले. सावकार पाटील याने या घराचे बनावट संचकारपत्र तयार करून विक्रीवर न्यायालयातून स्थगिती आणली. राधानगरी पोलिस ठाण्यात भोई यांनी पाटीलविरूद्ध फिर्याद दिली. यावेळी नामदेवने राधानगरी पोलिस ठाण्याचा कॉन्स्टेबल रूपेश कुंभार याला मध्यस्थी घातले. यावेळी त्याने पाच लाख आणि एक लाख ७० हजार रुपये न्यायालयाचा खर्च अशी सहा लाख ७० हजार रुपयांची मागणी केली. हे शक्य नसल्याने भोई यांनी दि. ३ मे २०१६ रोजी शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्याकडे तक्रार अर्ज केला. त्यांनी या अर्जाची चौकशी येथील महिला पोलिस उपनिरीक्षकाकडे दिली. तिने तक्रारदार भोई व सावकार पाटील या दोघांना दि. ५ मे २०१६ रोजी समोरासमोर बोलावून चौकशी केली. यावेळी पाटील याने आपले चार लाख मिळाले असून आपण आणखी पाच लाख रुपये मागत असल्याची कबुली दिली. महिला अधिकाऱ्याने भोई यांना बाहेर बोलावून ‘तुला पाच लाख रुपये नामदेवला द्यावे लागले असते, ते आम्ही वाचविले. सगळे प्रकरण आम्ही मिटवितो, त्याबद्दल तुला एक लाख रुपये आम्हाला द्यावे लागतील,’ असे सांगितले. त्यावर भोई हे पैसे त्यांना देण्यास कबूल झाले.

तक्रारदार विजय भोई यांच्याकडे शाहूवाडी विभागीय पोलिस उपअधीक्षक कार्यालयातील महिला पोलिस अधिकाऱ्याकडून एक लाख रुपये लाचेची मागणी झाली होती, हे खरे आहे. आम्ही या कार्यालयात सापळा लावला होता. नेमक्या त्याच दिवशी संबंधित महिला पोलिस अधिकारी गैरहजर होती.
- सुहास नाडगौंडा,
पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत
प्रतिबंधक विभाग, सातारा.


स्वहस्ताक्षरात नमुना
लाचेची मागणी करणाऱ्या या महिला पोलिस अधिकाऱ्याने तक्रारदारांना तक्रार मागे घेण्यासाठी स्वत:च्या हस्ताक्षरामध्ये अ‍ॅफिडेव्हिटचा नमुना तयार करून दिला आहे. आपल्याविरोधात तक्रार झाल्याचे समजताच तिने तुमचा मॅटर दिवाणी आहे, असे सांगून चौकशीकामी तो राधानगरी पोलिसांकडे पाठविला.
पुढचं बोलून घ्या...‘साहेब’ कोण?
‘साहेबांनी पुढचं बोलून घ्यायला सांगितलं आहे. तुमची रक्कम मोठी आहे. त्याबदली एक लाख रुपये साहेबांना द्यावे लागतील. मान्य असेल तर प्रकरण मिटवितो,’ असे ‘त्या’ महिला पोलिस अधिकाऱ्याने भोई यांना सांगितले. हा ‘साहेब’ कोण? चक्क पोलिस मुख्यालयाच्या मागे असलेल्या कार्यालयातून लाचेची मागणी होते. पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्या अवतीभोवतीच लाचखोर अधिकारी वावरत असल्याचे या घटनेवरून पुढे आले आहे.


सापळ्याची चाहूल लागताच गायब
कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर भोई यांनी पुणे विभागीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्याकडे शाहूवाडी पोलिस उपअधीक्षकांसह महिला अधिकाऱ्याविरोधात लेखी तक्रार केली. सरदेशपांडे यांनी साताऱ्याचे पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौंडा यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार १० जून २०१६ रोजी नाडगौंडा यांनी शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधीक्षक कार्यालयावर सापळा रचला. सरकारी पंचासह सात अधिकारी पाळत ठेवून होते. त्यावेळी लाचेची मागणी करणारी महिला पोलिस अधिकारी गैरहजर असल्याचे दिसून आले.

Web Title: Demand for bribe from women's army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.