आंबेवाडी गावचा सीटी सर्व्हे करण्याची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 12:27 PM2021-01-15T12:27:56+5:302021-01-15T12:29:02+5:30
Collcator Kolhapur-आंबेवाडी (ता. करवीर) गावचा सीटी सर्व्हे करण्यास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अनुकूलता दर्शवत लवकरच कार्यवाही करू, असे सांगितले. सरपंच सिकंदर मुजावर व उपसरपंच तेजस सुतार यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी देसाई यांनी हे आश्वासन दिले.
कोल्हापूर : आंबेवाडी (ता. करवीर) गावचा सीटी सर्व्हे करण्यास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अनुकूलता दर्शवत लवकरच कार्यवाही करू, असे सांगितले. सरपंच सिकंदर मुजावर व उपसरपंच तेजस सुतार यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी देसाई यांनी हे आश्वासन दिले.
आंबेवाडी चार हजार लोकवस्तीचे हे गाव पंचगंगा नदीला व कोल्हापूर शहराला लागून आहे. शंभर टक्के पूरग्रस्त असलेल्या या गावाचे सीटी सर्व्हे झालेले नसल्यामळे बांधकाम, व्यवसाय व तत्सम बाबींना कर्ज देण्याबाबत लोकांना अडचणींना सामना करावा लागत आहे.
उतारा नसल्याने बँका कर्जच देत नसल्याने शहरापासून अवघ्या एक किलोमीटर या हाकेच्या अंतरावर असताना देखील कोणत्याही सुधारणा गावात करता येत नाहीत. त्यामुळे हे उतारे द्यावेत आणि रखडलेला विकास मार्गी लावावा, अशी मागणी सातत्याने होत होती.
ग्रामस्थांनी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्यामार्फत यासंदर्भात निवेदन दिले होते. यावर मंत्री जयंत पाटील यांनीही हे उतारे देण्यास जिल्हाधिकाऱ्यांना सांगू, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुरुवारी झालेल्या बैठकीत मंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनीही लगेच कार्यवाही करावी, अशी विनंती सरंपचांनी केली. यावर देसाई यांनी कार्यवाही करू, असे आश्वस्त केले.