गडहिंग्लज शहराची हद्दवाढ करा हद्दवाढ कृती समितीची मागणी : मुश्रीफांना घातले साकडे
By admin | Published: May 11, 2014 12:21 AM2014-05-11T00:21:53+5:302014-05-11T00:21:53+5:30
गडहिंग्लज : प्रलंबित गडहिंग्लज शहर हद्दवाढप्रश्नी व्यक्तिश: लक्ष घालून आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हद्दवाढीला मंजुरी मिळवावी, अशी मागणी
गडहिंग्लज : प्रलंबित गडहिंग्लज शहर हद्दवाढप्रश्नी व्यक्तिश: लक्ष घालून आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हद्दवाढीला मंजुरी मिळवावी, अशी मागणी गडहिंग्लज शहर हद्दवाढ कृती समितीतर्फे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. नगरपालिकेच्या कार्यक्रमानिमित्त मंत्री मुश्रीफ गडहिंग्लज दौर्यावर आले होते, त्यावेळी कृती समितीच्या शिष्टमंडळाने त्यांच्याकडे ही मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, शताब्दी वर्षातच नगरपालिकेने खास ठरावाद्वारे हद्दवाढीची मागणी केली आहे. दरम्यान, पाच-सहा वर्षे हा ठराव कार्यवाहीविना शासनदरबारी पडून होता. त्याच्या पाठपुराव्यासाठी कृती समितीची स्थापना झाली. स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नामुळे शासनाकडून हद्दवाढीची घोषणा झाली. त्यानुसार नागरिकांनी पाठपुरावा केल्याने बड्याचीवाडी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्याकडून हद्दवाढीची लेखी संमती देण्यात आली. दरम्यान, २७ वर्षे हद्दवाढीचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहे. नजरचुकीने उद्घोषणेमध्ये २ सर्व्हे नंबरचा उल्लेख राहून गेल्यामुळे शासनाने सर्व कागदपत्रे जिल्हाधिकार्यांकडे परत पाठवली असून, हद्दवाढीची प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने संपूर्ण प्रक्रिया करण्याचा घाट घातल्याचे समजते. तथापि, नव्याने प्रक्रिया न राबविता जुन्या उद्घोषणेप्रमाणे हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर करावा, शासनाने आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून ‘ते’ २ सर्व्हे नंबर वगळून हद्दवाढीची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मुश्रीफ यांना भेटलेल्या शिष्टमंडळात कृती समितीचे अध्यक्ष डॉ. एम. एस. बेळगुद्री, कार्याध्यक्ष प्रा. शिवाजीराव होडगे, उपाध्यक्ष प्रा. अमृतराव देसाई, सचिव प्रा. एम. एस. मर्जे, पी. बी. आरबोळे, प्रा. आर. के. कोडोली, आर. आर. खोराटे, प्रा. एम. एस. शिंदे, व्ही. एम. बुगडीकट्टीकर, आर. एम. पटेल, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)