‘पंचगंगा’ पूररेषेतील भराव घालणाऱ्यांना रोखा, शेतकरी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 07:22 PM2020-03-05T19:22:22+5:302020-03-05T19:23:54+5:30
कोल्हापूर : पंचगंगा नदी पूररेषेत मोठ्या प्रमाणात भराव टाकून जागा बळकावण्याचे काम सुरू असून याकडे दुर्लक्ष केले, तर महापुरात ...
कोल्हापूर : पंचगंगा नदी पूररेषेत मोठ्या प्रमाणात भराव टाकून जागा बळकावण्याचे काम सुरू असून याकडे दुर्लक्ष केले, तर महापुरात संपूर्ण कोल्हापूर शहर बुडायला वेळ लागणार नाही. यासाठी कसबा बावड्यापासून सांगली फाटा, शिवाजी पुलापासून केर्ले तर फुलेवाडी ते बालिंगा या परिसरात पूररेषेत भराव घालणाऱ्यांना रोखा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली.
जुलै-आॅगस्टमध्ये आलेल्या महापुरात नदीकाठावरील गावे उद्ध्वस्त झाली. याला पूररेषेतील बांधकामे कारणीभूत असून, त्यातून काही बोध घेण्याची गरज होती. मात्र, आताही पंचगंगा नदीच्या पूररेषेत भराव टाकून जागा बळकावल्या जात आहेत. यामुळे महापुराचे संकट मोठे उभे असून, याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
याबाबत प्रशासनाने दुर्लक्ष केले, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय आपत्ती निवारण विभागाकडे जाऊ, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. माणिक शिंदे यांनी यावेळी दिला. यावेळी पी. जी. पाटील-वाकरेकर, श्रीकांत जाधव, आदी उपस्थित होते.